Join us

'सावळ्याची जणू सावली'मध्ये रंजक वळण, सावलीने सारंगसमोर व्यक्त केली मनातली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:41 IST

Savalyanchi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सारंग आणि सावलीची मैत्री फुलताना दिसत आहे.

'सावळ्याची जणू सावली' (Savalyanchi Janu Savali) मालिकेत सारंग आणि सावलीची मैत्री फुलताना दिसत आहे. यासाठी सारंग एक खास गिफ्ट सावलीला देतो, ज्यामुळे त्यांचे नाते आणखी घट्ट होते. अमृता आणि बबलू सारंग आणि सावलीच्या वागण्यात बदल जाणवून त्यांची  सावलीची छेड काढतात, सावलीला सारंगसोबत असताना वेगळे वाटायला लागते, पण ती स्वतःच्या भावना व्यक्त करू शकत नाही. 

सोहम तारासाठी एका स्पेशल कॉन्सर्टमध्ये अनोख्या पद्धतीने ग्रँड प्रपोजल करायचा विचारात आहे. सारंगला या इव्हेंटबद्दल समजतं आणि तो स्वतः भैरवीला विनंती करतो की सावलीला त्या दिवशी सुट्टी द्यावी. भैरवी त्याला नकार देऊ शकत नाही. सारंग सावलीला कॉन्सर्टला घेऊन असल्याचं सांगतो. त्याची इच्छा आहे की सावलीने  संपूर्ण कार्यक्रम त्याच्या सोबतच राहावे. बबलू आणि अमृता सावलीला सांगतात की तिने याच कॉन्सर्टमध्ये सारंगसमोर आपले प्रेम व्यक्त करावे. भैरवी सावलीला तिच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच वेगळं गाणं गाण्याचं चॅलेंज देते, ज्यामुळे ती संभ्रमात पडते. 

सारंग सावलीला कॉन्सर्टला घेऊन जातो पण सारंगची इच्छा आहे की तिने शेवटपर्यंत त्याच्यासोबतच राहावे. पण कार्यक्रम सुरू असताना परफॉर्मन्सची तयारीसाठी सावली गुपचूप बॅकस्टेजला जाते. मंचावर गाणे गात असताना सावलीला आपल्याच भावना समजतात. सारंगला गर्दीत अस्मी दिसते आणि तो तिला शोधण्याचा प्रयत्न करतो. सावली त्याच्या वागण्याने काळजीत आहे. यातच अचानक लाईट जातात आणि त्याला जुना अपघात आठवून भीतीचा झटका बसतो. सावली सारंगला घट्ट मिठी मारते, त्याला शांत करताना भावनांच्या भरात ती त्याच्या समोर अशा गोष्टीची कबुली देते जी ऐकून सारंग काय बोलेल याची कल्पनाच करता येणार नाही. अस्मी कोणतं नवीन वादळ घेऊन आली आहे ? सावलीने कोणत्या गोष्टीची कबुली सारंगला दिली आहे? हे जाणून घेणे कमालीचे ठरणार आहे.