Join us

​अमृता खानविलकर करणार डान्स इंडिया डान्सचे सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 14:09 IST

डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एक मराठमोळी ...

डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एक मराठमोळी अभिनेत्री या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळे सिझन हिट झाले आहेत. आता नवा सिझन एका नव्या ढंगात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात साहिल खट्टर प्रेक्षकांना सूत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि त्याला मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरची साथ लाभणार आहे. अमृता ही एक चांगली अभिनेत्री आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तिने फक्त लढ म्हणा, सतरंगी रे यांसारख्या मराठी चित्रपटात तर फूंक २, फूंक यांसारख्या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. अमृता ही एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली डान्सर देखील आहे. तिने एकापेक्षा एक या कार्यक्रमात एकाहून एक सरस नृत्य सादर केले होते. वाजले की बारा या लावणीवरील तिच्या नृत्यावर तर तिचे फॅन्स अक्षरशः फिदा आहेत. नच बलिये या कार्यक्रमात देखील ती तिचे पती हिमांशू मल्होत्रासोबत सहभागी झाली होती आणि या कार्यक्रमाचे विजेतपद देखील तिला मिळाले होते. ती एक चांगली डान्सर असल्याचे बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी देखील या कार्यक्रमात म्हटले होते. अनेक डान्स शोमध्ये भाग घेतल्यानंतर आता ती डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. लवकरच ती या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असून या कार्यक्रमासाठी ती खूपच उत्सुक असल्याचे समजतंय. डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमाने छोट्या पडद्याला आतापर्यंत खूप चांगले डान्सर मिळवून दिले आहेत. धर्मेश, पुनित, शक्ती यांसारख्या डान्सरनी या कार्यक्रमातूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. डान्स इंडिया डान्स हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाच्या ऑडिशनना देखील सुरुवात झाली आहे. या सिझनमध्ये देखील एकाहून एक चांगले डान्सर प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याने सगळ्यांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. Also Read : ​अमृता खानविलकरचे तिच्या आईसोबतचे फोटो पाहिलेत का?