Join us

महाभारत आजपासून होणार सुरू, वाचा किती वाजता आणि कुठे दाखवली जाणार ही मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 12:25 IST

महाभारत या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. ही मालिका आजपासून सुरू होत आहे.

ठळक मुद्देमहाभारत आजपासून सुरू होत असून डीडी भारती या वाहिनीवर रोज दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे रोज दोन भाग दाखवले जाणार आहेत.

रामायण आणि महाभारत या मालिकांना नव्वदीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण आणि महाभारत या कार्यक्रमांची आठवण आली आहे. रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत होती आणि आता तर प्रेक्षकांना आजपासून रामायण ही त्यांची आवडती मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. 

रामायणानंतर आता प्रेक्षकांची आणखी एक आवडती मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महाभारत या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. ही मालिका आजपासून सुरू होत असून डीडी भारती या वाहिनीवर रोज दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे रोज दोन भाग दाखवले जाणार आहेत.

महाभारत या मालिकेला इतकी वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. बी.आर.चोप्रा आणि रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत नितीश भारद्वाज, मुकेश खन्ना, गजेंद्र चौहान, प्रवीण कुमार, अर्जुन, पुनीत इस्सार, पंकज धीर, गुफी पेंटल आणि रुपा गांगुली यांच्या मुख्य भूमिका होत्या. आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना खऱ्या नावाने नव्हे तर या मालिकेतील व्यक्तिरेखांच्या नावानेच ओळखतात. 

टॅग्स :रामायणकोरोना वायरस बातम्या