अली शोध घेतोय आपल्या पत्नीचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 17:33 IST
बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता अली गोणी येणार असून ...
अली शोध घेतोय आपल्या पत्नीचा...
बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता अली गोणी येणार असून तो विराट ही भूमिका साकारणार आहे. अली रजनी ही त्याची पत्नी असल्याचा दावा करणार आहे. अलीची पत्नी ही रजनीसारखी दिसत असल्याने रजनी हीच त्याची पत्नी आहे असा समज करूनच तो रजनीच्या घरात येणार आहे. तो रजनीच्या कुटुंबियातील लोकांना तिची काही छायाचित्रे दाखवणार आहेत. ही छायाचित्रे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. कारण या फोटोत दिसणारी व्यक्ती हुबेहुब रजनीसारखीच असणार आहे. विराटच्या एंट्रीमुळे रजनीच्या कुटुंबात अनेक उलथापालथ घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या भूमिकेविषयी अली सांगतो, "मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी आहे. त्यामुळे या मालिकेचे चित्रीकरण करण्यास मी खूप उत्सुक आहे. या मालिकेचे चित्रीकरण करताना खूपच धमाल येईल असे मला वाटते. ही मालिका स्वीकारण्यामागे एक खास कारण आहे. या मालिकेच्या निर्माती आणि लेखिका सोनाली जाफर या माझ्या आवडत्या निर्माती आहेत. त्यांनी माझ्याासाठी खूप चांगली व्यक्तिरेखा लिहिली आहे याची मला खात्री आहे. ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडले अशी अाशा आहे." अलीने स्पिल्टव्हिलापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तो स्पर्धक म्हणून स्पिटव्हिला 5मध्ये झळकला होता. त्यानंतर त्याने कलश ही मालिका केली. पण खऱ्या अर्थाने ये है मोहोब्बते या मालिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत तो साकारत असलेली रोमी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते.