Join us

​अक्षय म्हात्रे पिया अलबेला या मालिकेत प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 16:11 IST

स्वर रे या मराठी मालिकेत झळकलेल्या अभिनेता अक्षय म्हात्रेला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगलाच स्ट्रगल करावा लागला. अनेक मराठी मालिकांमध्ये ...

स्वर रे या मराठी मालिकेत झळकलेल्या अभिनेता अक्षय म्हात्रेला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगलाच स्ट्रगल करावा लागला. अनेक मराठी मालिकांमध्ये काम केल्यानंतर तो युथ या चित्रपटात झळकला आणि आता तर तो पिया अलबेला या मालिकेत काम करणार आहे.पिया अलबेला ही मालिका राजश्री प्रोडक्शनची आहे. इतक्या मोठ्या बॅनरची मालिका मिळाल्यामुळे अक्षय सध्या खूप खूश आहे. या मालिकेत तो नरेन ही भूमिका साकारत असून नरेन हा मानसशास्त्राचा विद्यार्थी असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अतिशय श्रीमंत घराण्यातील तो मुलगा असून स्वभावाने तो काहीसा विक्षिप्त आहे. तो माणूसघाणा आणि एकलकोंडा असल्याचे सगळ्यांचे मत आहे. तो नेहमीच आपल्या ध्यानधारणेच्या विश्वात गुंग असतो. तो अशाप्रकारे का वागतो हे त्याच्या पालकांनादेखील माहीत नाहीये तर या मालिकेतील नायिका पूजा ही नरेनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ती सगळ्यांमध्ये मिसळणारी, हसत खेळत जगणारी आहे. ती कराटे चॅम्पियन असून विनाकारण त्रास देणाऱ्या मुलांना सरळ आणते. तसेच तिला नृत्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती नेहमीच कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करते. तिच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर मामानेच तिला वाढवले आहे. त्यामुळे ती तिच्या मामाची खूप लाडकी आहे. पण तिची मामी तिचा तिरस्कार करते. पूजा ही तिच्या स्वभावामुळे नरेनच्या कुटुंबियांना खूप आवडते आणि नरेनला हीच मुलगी समजून घेऊ शकते यावर त्यांचा विश्वास बसतो. पण नरेनचा प्रेम, लग्न या गोष्टींशी दूरदूरपर्यंत संबंध नाहीये. त्यामुळे नरेनचे पालक पूजाला नरेनला यातून बाहेर पडून वास्तव जीवनाची ओळख करून देण्याची कामगिरी सोपवतात. त्यामुळे ही एक आधुनिक विश्वमित्र-मेनेकाची कथा आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. या मालिकेत पूजाची व्यक्तिरेखा शीन दास ही साकारत असून अक्षयप्रमाणेच शीनचीदेखील ही पहिलीच मालिका आहे. अक्षय म्हात्रे आणि शीन दास ही नवी जोडी या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.