Join us
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर ​डॉ. अमोल कोल्हे साकारणार संभाजीराचांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 15:20 IST

डॉ. अमोल कोल्हेने राजा शिवछत्रपती या मालिकेत शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती आणि आता तो प्रेक्षकांना संभाजी राजांच्या भूमिकेत ...

डॉ. अमोल कोल्हेने राजा शिवछत्रपती या मालिकेत शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती आणि आता तो प्रेक्षकांना संभाजी राजांच्या भूमिकेत दिसणार आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत अमोल सोबतच अनेक प्रसिद्ध मराठी कलाकारही झळकणार आहेत. प्रतीक्षा लोणकर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत, शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता अमित बहल औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेचे लेखन प्रताप गंगावणे यांनी केले असून मालिकेची निर्मिती डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली राव आणि पिंकू बिस्वास यांनी केली आहे. छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यावर दृष्टीक्षेप टाकला तर एक बाब प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे लहानपणापासूनच अनेक चढ-उतार त्यांच्या आयुष्यात आले. वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचे छत्र हरवले. मात्र आजी जिजाऊसाहेबांच्या सावलीत स्वराज्याचे बाळकडू त्यांना मिळाले. अवघ्या नवव्या वर्षी मिर्झाराजांच्या गोटात जाऊन स्वराज्यासाठी मोगल मनसबदार झाले. दहाव्या वर्षी आग्र्याला शहेनशहा औरंगजेबाच्या दरबारात आपल्या बाणेदारपणाने भल्याभल्यांना चकित केले. आग्र्याहून सुटकेनंतर मथुरा ते राजगड प्रवास एकट्याने केला. पण युवराजपदी शंभूराजे विराजमान झाले आणि राजारामांच्या जन्मानंतर सुरू झालेल्या कुटुंबकलहाने डोके वर काढले. कारस्थानी कारभाऱ्यांनी स्वार्थासाठी महाराणी सोयराबाईंच्या मातृसुलभ भावनेला फुंकर घातली. आरोप आणि बदनामीची धुळवड शंभूराजांच्या आयुष्यात सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य आणि शंभूराजे दोन्ही पोरके झाले. घरातील वादळ सुरू असतानाच स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, आदिलशहा हे सारे शत्रू एकाचवेळी सज्ज झाले. त्यात भर म्हणून खुद्द शहेनशहा औरंगजेब अफाट सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. स्वराज्य धास्तावलं, स्वराज्याला प्रश्न पडला आता काय करेल शिव सिंहाचा छावा? कसा समोर जाईल या सुलतानी आक्रमणाला? छातीवर संकट झेलताना घरभेद्यांकडून तर वार होणार नाही ना? काय ठरवेल इतिहास शंभूराजांना स्वराज्यविध्वंसक की स्वराज्यरक्षक? याच आणि अशाच अनेक प्रश्नांवर आणि त्यांच्या उत्तरांवर स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचे कथासूत्र आधारलेले आहे.Also Read : काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप... असा असणार मालिकेचा शेवट