Join us

सुयश रायसोबत लग्न झाल्यानंतर अशाप्रकारे माझे आयुष्य बदलले असे सांगतेय किश्वर मर्चंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 17:30 IST

किश्वर मर्चंटने शक्तिमान या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती त्यानंतर कुटुंब, हिप हिप हुर्रे, कसोटी जिंदगी की, देस ...

किश्वर मर्चंटने शक्तिमान या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती त्यानंतर कुटुंब, हिप हिप हुर्रे, कसोटी जिंदगी की, देस में निकला होगा चांद, काव्यांजली, कसम से यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. ब्रम्हराक्षस या मालिकेत तिने नुकतेच काम केले होते. या मालिकेत तिने दोन भूमिका साकारल्या होत्या. ब्रम्हराक्षस या मालिकेत ती राक्षसाच्या भूमिकेतदेखील दिसली होती. आता ही मालिका संपत असून या मालिकेच्या एकंदर प्रवासाविषयी आणि तिच्या भविष्यातील प्रोजेक्टविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...ब्रम्हराक्षस या मालिकेत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?ब्रम्हराक्षस या मालिकेत सुरुवातीला मी केवळ एकच भूमिका साकारणार असे ठरले होते. पण त्यानंतर ब्रम्हराक्षस या भूमिकेत मी झळकणार असल्याचे मला सांगण्यात आले. सुरुवातीला ही भूमिका साकारताना मला भीती वाटली होती. प्रेक्षक मला या भूमिकेत स्वीकारतील की नाही याचे दडपण आले होते. पण प्रेक्षकांना माझी ही भूमिका खूपच आवडली. सगळ्यांनी माझ्या या भूमिकेचे कौतुक केले. अनेक मालिकांमध्ये आपल्याला केवळ सासू-सूनेेंची भांडणेच पाहायला मिळतात. पण या मालिकेची कथा ही खूप वेगळी असल्याने प्रेक्षकांना ही मालिका प्रचंड आवडली. तू गेली 18-19 वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहेस, गेल्या अनेक वर्षांत छोटा पडदा कशाप्रकारे बदलला आहे असे तुला वाटते?गेल्या काही वर्षांत छोट्या पडद्यावर प्रचंड अधोगती झाली आहे असे मला वाटते. सध्याचा प्रेक्षकही खूप बदलला आहे. मला स्वतःला साया, दास्तान, बनेगी अपनी बात यांसारख्या मालिका खूप आवडायच्या. पण आता तशा मालिकाच छोट्या पडद्यावर बनत नसल्याने मी मालिका पाहातच नाही. आजची कोणतीही मालिका पाहाताना एक प्रेक्षक म्हणून मी त्याच्याशी जोडली जात नाही असे मला वाटते. पण जोपर्यंत प्रेक्षकांना अशाच मालिका पाहायला आवडतात, तोपर्यंत छोट्या पडद्यावर प्रगती होणार नाही.तुझे नुकतेच सुयश रायसोबत लग्न झाले, लग्नानंतर तुझ्या आयुष्यात किती बदल घडला?सुयशला मी अनेक वर्षांपासून ओळखते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर आमच्या दोघांच्या नात्यात काही फरक पडला नाही. पण लग्नानंतर माझ्या आयुष्यात खूप फरक पडला आहे. कारण लग्न झाल्यानंतर माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. तसेच प्रत्येक निर्णय मला घ्यावे लागतात. लग्नाआधी चित्रीकरण संपले की मी घरी जाऊन मस्तपैकी झोपत असे आणि सुट्टी असली की मित्रमैत्रिणींसोबत फिरत असे. पण आता घरातील सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो.या मालिकेनंतर आता तू कोणत्या मालिकेत झळकणार आहेस?छोट्या पडद्यावर अनेक वर्षं काम केल्यानंतर आता मी रंगभूमीवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला आहे. सेल्फी या इंग्रजी नाटकाचे मी जगभर दौरे करणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेत्री तनाज करिमचे असून या नाटकात मी, तनाज, श्वेता गुलाटी, प्रिया मलिक आणि डिम्पल शहा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये भेटलेल्या पाच स्त्रियांची ही कथा असून या अनोळखी स्त्रिया ट्रेन यायला उशीर असल्याने एकमेकांशी गप्पा मारायला लागतात आणि आपल्या आयुष्यातील समस्या एकमेकांसमोर मांडतात. या नाटकाचा शेवट खूपच छान आहे. काही महिने तरी मी या नाटकाचे प्रयोग करणार आहे. मे महिन्यानंतर कोणत्या मालिकेत काम करायचे हे मी ठरवेन.