नामकरणमध्ये आदिती राठोडची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 13:08 IST
नामकरण ही मालिका लीप घेणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या मालिकेत बरखा बिष्ठ प्रमुख भूमिका साकारत होती. ...
नामकरणमध्ये आदिती राठोडची एंट्री
नामकरण ही मालिका लीप घेणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या मालिकेत बरखा बिष्ठ प्रमुख भूमिका साकारत होती. पण या मालिकेच्या कथानकाच्या मागणीनुसार तिचा मृत्यू झाल्याचे मालिकेत दाखवण्यात आले. बरखाने या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले होते. बरखाने मालिका सोडल्यानंतर या मालिकेची कथा ही अवनी या व्यक्तिरेखेभोवतीच फिरत आहे. अवनी ही भूमिका महत्त्वाची असल्याने लीपनंतर अवनीची भूमिका कोण साकारणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या मालिकेत अवनीच्या भूमिकेत सोनल वेंगुर्लेकर, वृषिका मेहता यांसारख्या छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्री झळकणार असल्याचे म्हटले जात होते. पण या सगळ्यांमध्ये आता आदिती राठोडने बाजी मारली आहे. आदिती आता प्रेक्षकांना तरुण अवनीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आदितीने कुमकुम भाग्य, एक दुजे के वास्ते यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेत सध्या अवनी 10 वर्षांची असल्याचे दाखवण्यात येत आहे. मालिकेने लीप घेतल्यानंतर मालिकेचे कथानक 12 वर्षं पुढे गेले असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता तरुण अवनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. छोट्या अवनीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले असल्याने तितक्याच ताकदीच्या अभिनेत्रीची अवनीच्या भूमिकेसाठी निवड करण्यासाठी प्रोडक्शन टीमने अनेक अभिनेत्रींचा गेल्या काही दिवसांत विचार केला होता आणि अनेक अनेक ऑडिशननंतरच आदितीची निवड करण्यात आली आहे. या मालिकेत काम करण्यास आदिती खूप उत्सुक आहे. या भूमिकेविषयी आदिती सांगते, "अवनीची व्यक्तिरेखा ही मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी असल्याने मी यावर खूप मेहनत घेत आहे. महेश भट्ट यांच्यासारख्या नामवंत आणि प्रसिद्ध दिग्दर्शनाच्या हाताखाली मला काम करायला मिळत आहे याचा मला आनंद होत आहे."