Join us  

Urvashi Dholakia Accident: अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला अपघात, स्कूल बसने दिली जोरदार धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 9:59 AM

स्वत: कार चालवून शूटिंगला जात असताना घडली घटना

Urvashi Dholakia Accident: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकियाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उर्वशीच्या कारला शनिवारी अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मीरा रोडवर असलेल्या फिल्म स्टुडिओमध्ये उर्वशी तिच्या कारमधून शूटिंगसाठी जात होती. त्यावेळी मुलांना घेऊन जाणाऱ्या एका स्कूल बसने तिच्या कारला मागून धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बसने मारलेली धडक खूपच जबरदस्त होती. उर्वशी गाडी चालवत असताना अचानक हा अपघात झाला. सुदैवाची बाब म्हणजे, या अपघातात अभिनेत्री उर्वशीसह तिच्या कारमधील तिचा स्टाफ थोडक्यात बचावले.

अपघातानंतर या प्रकरणाबाबत उर्वशीने प्रतिक्रिया दिली. "हा अपघात मोठा होता. मात्र, आम्ही सारे बचावलो. आम्हाला फारशी दुखापत झालेली नाही. चाहत्यांनी काळजी करू नये करावी. डॉक्टरांनी मला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मी पूर्णपणे तंदुरुस्त होईन," अशी माहिती स्वत: उर्वशीने दिली. याशिवाय उर्वशीने स्कूल बसच्या चालकावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

कोण आहे उर्वशी ढोलकिया?

उर्वशी ढोलकिया एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. 'कसौटी जिंदगी की' या प्रसिद्ध शोमध्ये 'कोमोलिका'ची भूमिका वठवून ती घराघरांत पोहोचली. उर्वशीचे कोमोलिका हे पात्र जरी खलनायिकेचे असले तरीही तिने तिच्या अभिनयाने साऱ्यांची मनं जिंकली. ही अभिनेत्री टीव्हीवरील वादग्रस्त मानला जाणारा बिग बॉस या रिअँलिटी शो च्या सीझन ६ ची विजेती देखील आहे. याशिवाय उर्वशीने इतरही अनेक टीव्ही शो केले आहेत.

टॅग्स :उर्वशी ढोलकियाअपघातटेलिव्हिजनबिग बॉस