Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत लवंगी साकारतेय अभिनेत्री स्वरांगी मराठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 10:34 IST

लवंगीबद्दल अधिकारवाणीने सांगता येईल अशी कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नाही. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात लवंगीबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे.

छोट्या पडद्यावरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर उचलून घेतलं. कुठलीही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना पटेल अशी निभावणं हे कलाकारासाठी आव्हानात्मक असतं आणि तीच भूमिका सहजरित्या निभावणं हे त्या कलाकाराचं यश आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय.

 

स्वराज्यरक्षक संभाजी‘ मालिकेत सध्या मराठ्यांच्या मुरुड जंजीरा या मोहिमेवर कथानक सुरु आहे. या कथानकाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या लवंगी या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री स्वरांगी मराठे हि साकारत आहे. जंजिरा किल्ल्याचा सुभेदार सिद्धी खैरत याच्या दासीच्या रुपात झळकलेल्या लवंगीने आपल्या सौंदर्याची भुरळ प्रेक्षकांवर पाडली आहे.

स्वरांगी मराठे साकारत असलेली लवंगी ही मराठ्यांच्या इतिहासातील एक गूढ व्यक्तिरेखा आहे. रोह्याच्या खाडीत लपलेल्या मुरुड जंजीऱ्याने अभेद्य किल्ला म्हणून नावलौकिक मिळवला होता. या किल्यावर भगवा फडकवण्याची जबाबदारी संभाजी महाराजांनी पराक्रमी सरदार कोंडाजी फर्जंद यांच्यावर सोपवली होती. कोंडाजी बाबांनी जंजीऱ्यावर जाऊन सिद्धी खैरतशी मैत्री केली. दरम्यान सिद्धीने त्यांना आपली दासी लवंगी भेट स्वरुपात दिली होती.

या लवंगी बाईवर कोंडाजी फर्जंद यांचे प्रेम होते व तिच्यामुळेच मराठ्यांची जंजीरा मोहिम फसली, अशा काही आख्यायिका इतिहासात आहेत. परंतु लवंगीबद्दल अधिकारवाणीने सांगता येईल अशी कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नाही. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात लवंगीबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे.

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजी