बिग बॉस चा १८ (Bigg Boss 18) वा सीझन नुकताच संपला. टीव्ही अभिनेता करणवीर मेहरा यंदाची बिग बॉसची ट्रॉफी जिंकला. या सीझनमध्ये मराठमोळी शिल्पा शिरोडकरही (Shilpa Shirodkar) सहभागी झाली होती. शिल्पाचा करणवीर आणि विवयन डिसेना दोघांसोबतही चांगला बाँड होता. फिनालेच्या काही दिवस आधीच शिल्पा शोमधून बाहेर पडली. बाहेर येताच तिने हैदराबादला जाऊन बहीण नम्रता शिरोडकरची भेट घेतली. नुकतीच ती मुंबईत परतली आहे. आता बिग बॉसनंतर ती आणखी कोणत्या रिएलिटी शोमध्ये दिसणार का? यावर तिने उत्तर दिलं आहे.
हैदराबादमध्ये बहीण नम्रता शिरोडकरचा वाढदिवस साजरा करुन शिल्पा मुंबईत आली. विमानतळावर तिला पापाराझींनी घेरलं. यावेळी तिला आता बिग बॉसनंतर काय असं विचारण्यात आलं. तसंच रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी' शोमध्ये जाणार का? असाही प्रश्न विचारला. तेव्हा शिल्पा लगेच म्हणाली, "मी तो शो कधीच करणार नाही. आता मला मराठी, हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये काम करायला आवडेल. पण रिएलिटी शो आता मी करणार नाही."
शिल्पा यावेळी विमानतळावर एकदम साध्या लूकमध्ये दिसली. चेक्स प्रिंट कुर्तामध्ये ती सुंदर दिसत होती. शिल्पाला आता पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ९० च्या दशकात तिने सिनेमांमधून चांगली लोकप्रियता मिळवली होती. मधल्या काळात ती हिंदी मालिकेतही दिसली. मात्र नंतर काम मिळणंच बंद झाल्याने शिल्पाने यावेळी बिग बॉस शोमध्ये भाग घेतला. यातही ती बरेच दिवस टिकून होती.