कलर्स मराठीवरील '# लय आवडतेस तू मला' (# Lai Aavdtes Tu Mala Serial) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. सरकार आणि सानिकाच्या प्रेमाच्या गोष्टीने प्रेक्षकांना बांधून ठेवले असतानाच त्यांच्या नुकत्याच सुरू झालेल्या सुखी संसारात लवकरच एक मोठं वळण येणार आहे. मालिकेत २० एप्रिलपासून दोन नव्या पात्रांची एंट्री होणार आहे यामुळे कथेला नवे वळण मिळणार आहे. या दोघांपैकी पहिलं पात्र म्हणजे अम्मा. ही भूमिका साकारत आहे अभिनेत्री संजीवनी पाटील (Sanjivani Patil).
सरकार आणि सानिका आपल्या हनिमूनवर जात असताना अचानक एका अडचणीत अडकतात, जेव्हा ते कुठल्याशा सुनसान ठिकाणी मदतीच्या शोधात असतात. अशा वेळी अम्मा या रहस्यमय स्त्रीची एन्ट्री होते. अम्मा त्यांना मदत करते आणि या जोडप्याला तात्पुरता दिलासा मिळतो. मात्र, अम्माची ही मदत त्यांच्या सुखी संसारावर कुठल्या वादळाची चाहूल देणार आहे का? अम्माचं खरं उद्दिष्ट नेमकं काय आहे? तिची उपस्थिती सरकार - सानिकाच्या नात्याला कसोटीवर उभं करेल का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक ठरणार आहे.
संजीवनी पाटील कमबॅकबद्दल म्हणाल्या...
संजीवनी पाटील म्हणाल्या, "एका कलाकाराला नेहमी एका चौकटीच्या बाहेर जाऊन काम करायला आवडतं आणि आता तशीच एक भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. त्या भूमिकेद्वारे मी पुन्हा एकदा तुमच्या समोर येते आहे. तब्बल दोन अडीच वर्षांनंतर मी तुमच्या भेटीला पुन्हा येते आहे. त्यामुळे मी खूश आहे. कारण मी अशाच भूमिकेच्या शोधत होते आणि त्याचवेळेस मला विचारणा झाली या भूमिकेबद्दल आणि मी एका क्षणाचा सुद्धा विचार न करता होकार दिला. सरकार सानिकाचं आयुष्य आता कुठे सुखी वळणावर आलं आहे आणि तसं असताना अम्मा त्यांच्या आयुष्यात एक नाही अनेक ट्विस्ट घेऊन येणार आहे. या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ही भूमिका नक्की आवडेल याची मला खात्री आहे. याआधी माझ्या भूमिकेला भरभरुन प्रेम मिळाले आहे तसेच यावेळेस द्याल हिच आशा आहे."