Join us

'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेत अभिनेत्री पुर्णिमा डेची वर्णी, दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 18:50 IST

Kunya Rajachi Ga Tu Rani : 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

स्टार प्रवाहवर १८ जुलैपासून सुरु होणाऱ्या कुन्या राजाची गं तू रानी मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेचे प्रोमो, शीर्षकगीताला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. गुंजा-कबीरच्या आयुष्यात नेमकं कोणतं नाट्य घडणार हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. गुंजा आणि कबीरसोबतच या मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे मृण्मयी. कबीरवर निस्स्मीम प्रेम करणारी मृण्मयी मराठीची प्रोफेसर आहे. नखशिखांत सुंदर आणि श्रीमंतीत वाढलेली. कुणावरही पटकन विश्वास न टाकणारी, पण एखाद्यावर विश्वास जडला की अखेरपर्यंत निभावणारी अशी ही मृण्मयी. अभिनेत्री पुर्णिमा डे मृण्मयीची व्यक्तिरेखा साकारत आहे.

मृण्मयी या व्यक्तिरेखेबद्दल पौर्णिमा म्हणाली, मी खूप दिवस ज्या भूमिकेच्या शोधात होते ती भूमिका मला मृण्मयीच्या रुपात भेटली. मनाने हळवी मात्र मनस्वी असं हे पात्र आहे. या पात्राला खूप शेड्स आहेत. तिच्या सधन असण्याचा तिला अजिबात अहंकार नाही. मात्र कबीर ने तिच्यापासून कधी काही लपवू नये इतकीच तिची भाबडी अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृण्मयी दुष्ट नाही. नावाप्रमाणेच ती मृदू स्वभावाची आहे. मराठीची प्रोफेसर असल्यामुळे समजून घेणं आणि समजावून सांगणं तिला उत्तम जमतं. या मालिकेतला माझा लूकही खूप वेगळा आहे.

ती पुढे म्हणाली की, स्टार प्रवाह वाहिनी, आमच्या निर्मात्या स्मृती शिंदे आणि डिझायनर वैशाली देशमुख यांनी खूप उत्तमरित्या माझा लूक डिझाईन केला आहे. मला हे पात्र साकारताना अतिशय आनंद मिळतोय. प्रेक्षकांनाही हे पात्र आणि ही मालिका नक्कीच आवडेल. पाहायला विसरु नका कुन्या राजाची गं तू रानी १८ जुलैपासून सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.