Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने 'या' कारणासाठी मानले प्रेक्षकांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 13:57 IST

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने नुकतेच छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत पहायला मिळते आहे. यात तिने नेहाची भूमिका साकारली आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहे. नुकतेच तिने या मालिकेतील तिचे फोटो शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

प्रार्थना बेहरे हिने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील तिचे फोटो शेअर करत लिहिले की, नेहावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावासाठी मी तुमचे आभारी आहे. खूप भारी वाटत आहे. असेच प्रेम आणि आशीर्वाद देत रहा. 

प्रार्थना बेहरेने मालिकेबद्दल सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्याच मालिकांच्या ऑफर आल्या. मात्र तेव्हा मी फक्त चित्रपटात काम करायचे ठरवले होते. आपले फॅन्स आपल्याला पाहण्यासाठी उत्सुक असतात. म्हणून मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा निर्णय घेतला आणि ही मालिका स्वीकारली. नेहा ही खूप साधी-सरळ आहे. ती आणि तिची मुलगी परी यांचे एक छोटंसे जग आहे आणि या त्यांच्या विश्वात जेव्हा यशवर्धनची एन्ट्री होते तेव्हा त्यात काय भावनिक बदल होतो हे या मालिकेत पाहायला मिळेल. 

ती पुढे म्हणाली की, श्रेयस सारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याचे माझे स्वप्न होते. त्यांच्यासोबत चित्रपटात भूमिका मिळावी अशी माझी इच्छा होती. पण मालिकेत सहकलाकार आणि त्यातही प्रेमाच्या संवेदनशील गोष्टीवर ही मालिका आहे त्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली. 

टॅग्स :प्रार्थना बेहरेश्रेयस तळपदे