महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांचा मुलगा सोहम बांदेकर (Soham Bandekar) याच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. स्टार प्रवाह वरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत दिसणारी अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Pooja Birari) तो लग्नबंधनात अडकणार आहे. सोहम सध्या बांदेकर प्रोडक्शन्स अंतर्गत सुरु असलेल्या 'ठरलं तर मग'आणि 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकांच्या निर्मितीचं काम बघत आहे. अशातच लग्नाची बातमी पसरल्याने सोहम आणि पूजा दोघंही चर्चेत आले. त्यांच्या नात्यावर अद्याप कुटुंबातील कोणीही माहिती दिलेली नाही. मात्र नुकतंच बांदेकरांच्या घरी गणपती बाप्पाच्या आरती वेळी पूजा बिरारीही दिसली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्या घरी बरीच गर्दी दिसते. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार असे सगळेच बाप्पााच्या दर्शनाला आलेले दिसत आहेत. सगळे एकदम जल्लोषात आरती म्हणत आहे. अगदी प्रसन्न वातावरण बघायला मिळत आहे. पत्नी सुचित्रा बांदेकर, मुलगा सोहम हे देखील आहे. सोहम टाळ वाजवण्यात तल्लीन झालेला दिसतोय. तर सुचित्रा बांदेकरही टाळ्या वाजवत आरती म्हणत आहेत. कुटुंबातील वयस्कर मंडळींचा उत्साहही अपार आहे. दरम्यान व्हिडिओत सुचित्रा यांच्या मागेच पूजा बिरारी उभी असल्याचं दिसत आहे. पिवळ्या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत आहे. आपल्या होणाऱ्या सासरी गणेशोत्सवात ती देखील आनंदाने सहभागी झालेली दिसत आहे. तर आधीच्या व्हिडिओमध्ये ती मागे सोहमसोबतच उभी असल्याचीही झलक दिसते.
या व्हिडिओवर कमेंट करत प्रेक्षकांनी बांदेकरांच्या घरातील बाप्पााच्या आरतीसाठी असलेल्या उत्साहपूर्ण वातावरणाची स्तुती केली आहे. तसंच काहींचं पूजा बिरारीवरही गेलं. 'गणपती बरोबर तुमच्या भावी सुनबाई चे पण दर्शन झालं. सासू सून सोबत एकदम मस्त दिसते दृष्ट काढा','भावी सूनबाई पण आहेत आरतीला..छान','पुजा बिरारी आणि सोहमची बातमी खरी आहे म्हणजे!' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.