Join us  

अभिनय सोडून संन्यासी झालेली अभिनेत्री अडकली केदारनाथमध्ये; हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 8:50 AM

Nupur alankar:अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेल्या नुपूरने कलाविश्वाला रामराम करत संन्यासी होण्याचा मार्ग पत्करला.

कलाविश्वात सध्या असे काही कलाकार आहेत ज्यांनी झगमगती इंडस्ट्री सोडून वैराग्य, संन्यास स्वीकारला आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे नुपूर अलंकार. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेल्या नुपूरने कलाविश्वाला रामराम करत संन्यासी होण्याचा मार्ग पत्करला. नुकतंच नुपूरने केदारनाथ मंदिराचं दर्शन घेतलं. मात्र, केदारनाथमध्ये दरड कोसळल्यामुळे ती त्या ठिकाणी अडकली.ज्यामुळे हेलिकॉप्टरच्या मदतीने तिला वाचवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिने याविषयी माहिती दिली आहे.

'शक्तिमान', 'घर की लक्ष्मी बेटियां' ,'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये नुपूरने काम केलं आहे. मात्र, २०२२ मध्ये तिने सारं काही सोडून संन्यासी होण्याचा निर्णय घेतला. कलाविश्व सोडल्यानंतर ती देशभरातील अनेक मंदिरांमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेत आहे. यामध्येच तिने उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचं दर्शन घेतलं. याचे काही फोटो, व्हिडीओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, परतीच्या वाटेवर येत असताना मुसळधार पावसामुळे येथे दरड कोसळली. परिणामी, ती या ठिकाणी अडकली. तिच्यासोबत अन्य काही भाविकदेखील होते.

दरम्यान, हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या भाविकांना सुखरुपरित्या वाचविण्यात आलं आहे. नुपूर ज्या ठिकाणी अडकली होती तिकडे एक डिग्री तापमान होतं असंही तिने या व्हिडीओत सांगितलं. दरम्यान, नुपूर जवळपास २७ वर्ष मनोरंजन क्षेत्रात कार्यरत होती. त्यानंतर तिने वैराग्य पत्करण्यासाठी कलाविश्वासह तिचं घरदारही सोडलं. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीकेदारनाथ