Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री निर्मिती सावंत यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 18:58 IST

Nirmiti Sawant : गेल्या अनेक वर्षापासून आपल्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना लोटपोट होईपर्यत हसवणाऱ्या निर्मिती सावंत लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून आपल्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना लोटपोट होईपर्यत हसवणाऱ्या निर्मिती सावंत बऱ्याच मोठ्या कालावधीपासून छोट्या पडद्यावर पाहायला मिळाल्या नाहीत. मात्र आता त्यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. लवकरच त्या एका मालिकेत पाहायला मिळणार आहेत. ही मालिका म्हणजे कन्यादान. या मालिकेत त्या आत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

सन मराठी वाहिनीवरील ‘कन्यादान’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. अविनाश नारकर, उमा सरदेशमुख, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, अमृता बने, प्रज्ञा चवंडे हे कलाकार ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. आता या मालिकेतील महाले कुटुंबात वंदू आत्याची एंट्री होणार आहे. विनोदाची महाराणी अशी ओळख असणारी अभिनेत्री निर्मिती सावंत ‘वंदू आत्या’ची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 

महाले कुटुंबातील अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असणारी आत्या ‘चांगल्या सोबत चांगली, आणि वाईट असणाऱ्या सोबत तेवढीचं वाईट’ अशा स्वभावाची आहे. मात्र, आशालता आणि तिच्या तीनही मुलांसाठी आत्या ही नावडती व्यक्ती आहे. महाले कुटुंबातील सर्व रहस्य आणि आशालाताच्या कारस्थानी युक्त्यांविषयी वंदू आत्याला सगळं माहित आहे. त्यामुळे, आशालतावरही आत्याचा कायम दबाव राहिला असून, आशालाताने आपल्या तीनही मुलांना नेहमीच आत्याविषयी वाईट सांगून त्यांना तिच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता अनेक वर्षानंतर आत्या महालेंच्या घरी येणारं आहे. त्यावेळी तिच्या स्वभावातील विविध पैलू महाले कुटुंबियांना अनुभवयाला मिळणार आहेत. शिवाय, आजवर ज्या आशालतामुळे या तीनही मुलांना आत्याविषयी राग आहे त्यांनाही आत्याच्या स्वभावातील प्रेमळपणाची जाणीव होणार आहे. अनेक वर्षांनंतर महालेंच्या घरी येणारी वंदू आत्या, आता तिच्या स्वभावातील सकारात्मकता आणि प्रेम त्यांच्यापर्यत कसं पोहोचवणार हे पाहायला मजा येणार हे मात्र नक्की. महालेंच्या घरातील गुपितं फोडण्यासाठी येणारी वंदू आत्या भरपूर मजा-मस्ती, आनंद आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा परिपूर्ण खजिना घेऊन येणार आहे.