Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शिवा' मालिकेतील या सीन दरम्यान अभिनेत्री मीरा वेलणकरचे पाणावले डोळे, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 15:17 IST

Meera Welankar : १२ मे रोजी मातृ दिन असून या निमित्ताने मीरा वेलणकरने मालिकेदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.

झी मराठी वाहिनीवरील शिवा मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. मालिकेत शिवा आणि आशुची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. या मालिकेत आशुच्या आईची भूमिका अभिनेत्री मीरा वेलणकर (Meera Welankar) हिने साकारली आहे. १२ मे रोजी मातृ दिन असून या निमित्ताने मीरा वेलणकरने मालिकेदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. 

'शिवा' मालिकेतल्या सीताई म्हणजेच मीराने आपल्या आईपणाचे आणि सेटवर आशुच्या आईची भूमिका निभावताना असं काय झालं की तिला रडू आले.जो पर्यंत मी आई झाले नव्हते तो पर्यंत माझं पूर्ण लक्ष माझ्या करिअरवर होते. मी जाहिरात क्षेत्रात काम करत होते. म्हणतात ना आई झाल्यावर आयुष्य बदलून जाते तर त्या वाक्याचा अर्थ नाही कळायचा असा वाटायचे की बाळ झाल्यावर काही महिन्यांसाठी वेळ आणि लक्ष बाळावर राहील आणि मग काही महिन्यातनंतर सर्व पाहिल्यासारखं होईल. पण आई झाल्यावर लक्षात आलं की माझ्यामध्ये आपणहुन बदल होत आहेत,  ते लहानबाळ तुमचं सर्व लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेते. आईपण शिकावं नाही लागतं ते तुमच्यामध्ये आपसूक येते. 

माझी आई माझी हिरो आहे

तिने पुढे म्हटले की, माझा मुलगा जन्माला आला तेव्हा सुरूवातीचे काही दिवस माझ्या डोक्यात हाच विचार चालू असायचा की त्यांनी खाल्लं का, त्याची अंघोळ झाली का, त्याला आता भूक लागली असेल का?  ह्या सर्वामध्ये मी हे विसरून जायचे की माझी विश्रांती झाली आहे की नाही आणि हे सगळं फक्त आईपण अनुभवल्यावरच होऊ शकते. कुठली ही गोष्ट असो ती अभ्यासपूर्व करायची अशी माझी पद्धत आहे म्हणून मी गरोदर असताना प्रेग्नन्सी, पोस्ट-प्रेग्नन्सी, मुलाचं संगोपन, मुलाचा विकास  ह्या सगळ्याची खूप पुस्तक वाचली होती खूप माहिती होती पण जेव्हा मी खऱ्या अर्थानी आई झाले तेव्हा कळले की ती माहिती आहे, अनुभव नाही. माझा मुलगा खूप लाजाळू आणि अंतर्मुख होता त्याला शाळेत आणि लोकांशी रमायला वेळ लागायचा आणि यामुळे मी तिथे असणं अपरिहार्य असायचं, मी कधी-कधी थकून जायचे  त्यावेळी मला समजले की संयम किती महत्वाचं आहे, फक्त संयमच नाही तर स्वीकृती असणे ही गरजेचं आहे. आई म्हणून माझ्या हे लक्षात आलं  की माझ्या मुलाचा स्वभाव वेगळा आहे आणि मी ते स्वीकारले तेव्हा त्याच्यातला ही बदल मला दिसू लागला आता त्याच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की तो अंतर्मुख होता इतका उस्फुर्त मुलगा आहे. आम्ही तिघी बहिणी, माझी आई शिक्षिका होती आणि ती घर आणि काम दोन्ही सांभाळायची. ती माझी हिरो आहे. मी तिला इतकच बोलू शकते खूप खूप धन्यवाद कारण ती जे करू शकली ती एक सुपरवुमनच करू शकते. 

'शिवा' मालिकेत मी आशुची आई आहे आणि त्याच आणि माझं नाते खूप प्रेमळ आहे. माझा मुलगा फक्त १२ वर्षाचाच आहे . 'शिवा' मालिकेच्या निमित्ताने मला कळेल की मला पुढे जाऊन कसं  वागायला हवे आणि कसं नाही. एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतोय,"एकदा तुम्ही आई झालात की तुमच्यात एक प्रेमभावना असते, मग ते ऑनस्क्रीन मुलगा असो किंवा खरा मुलगा. त्यादिवशी आम्ही एक सीन करत होतो जिथे आशु रात्रभर घरी आलेला नसतो आणि आई म्हणून मी अत्यंत काळजीत असते. मग अचानक तो घरी येतो मी त्याला पाहते आणि रडायलाच लागते तेव्हा माझ्या मनात हे चालू होते की खऱ्या आयुष्यात जर माझा मुलगा घरी आला नाही तर मी काय करेन त्या विचाराने शॉट देता देता माझं डोळे पाणावले. तो सीन करताना माझ्या मनाची खूप चलबिचल झाल्याचे मीरा वेलणकरने सांगितले.