सन मराठीवरील 'प्रेमास रंग यावे' (Premas Rang Yave Serial) या मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. मालिकेत सुंदर व अक्षरा मेनकाचे खरे रूप सगळ्यांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता मालिका रंजक वळणावर आली आहे. सुंदर व अक्षरा पुन्हा कधी एकत्र येणार ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. मालिकेतील कलाकार फावल्या वेळेत काय करत असतील हा प्रश्न बऱ्याच प्रेक्षकांना पडतो. 'प्रेमास रंग यावे' या मालिकेतील अक्षरा म्हणजेच अभिनेत्री अमृता फडके (Amruta Phadke) फावल्या वेळेत फोन न वापरता विणकाम करते.
विणकामाबद्दल अमृता फडके म्हणाली, "लहानपणासून मी विणकाम करत आहे. शाळेत असताना १ तास आम्हाला विणकाम शिकवले जायचे. माझ्या घरातही आजी,आई यांना विणकामाची प्रचंड आवड आहे. हा गुण मला त्यांच्याकडूनच आला आहे. खरे सांगायचे झाले तर, मला फावल्या वेळेत फोनवर रिल्स पाहणं किंवा सोशल मीडियाचा वापर करणे आवडत नाही. यापेक्षा मला आनंद मिळणाऱ्या गोष्टी करायला आवडतात. सेटवर अगदी ५ मिनिट जरी वेळ मिळाला तरीही माझ्या हातात विणकामाचे साहित्य असते. मला असे वाटते ही माझी शेवटची पिढी आहे जी विणकाम करते. म्हणूनच मला ही आवड जोपासायची आहे आणि माझ्या पुढच्या पिढीला विणकाम शिकवायचे आहे."
अमृताला वाटत नाही या गोष्टीची भीती"सध्या सोशल मीडियावर सक्रीय राहणं खूप महत्त्वाचे झाले आहे. आपण काही ही काम करत असू तरीही इंस्टावर फोटो पोस्ट करणे गरजेचे आहे असे मानले जाते. त्यामुळे आपण कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. पण माझे मत यापेक्षा वेगळे आहे. आपण जे काम करत आहोत ते काम प्रेक्षक टेलिव्हिजनवर पाहणार आहेत.आपले काम उत्तम असेल तर प्रेक्षकांकडून आपल्याला लोकप्रियता मिळेलच. म्हणून मी सोशल मीडियावर काही पोस्ट करत नाही. यापूर्वी प्रेक्षक मला विसरतील ही भीती होती पण आता ती भीती नाही, असे अमृता सांगते.
अमृताला नैसर्गिक वातावरणात रमायला आवडतेअमृता पुढे म्हणाली की, "मुख्य म्हणजे नशीब आणि आपली मेहनत या दोन गोष्टींवर माझा प्रचंड विश्वास आहे. आपल्याला आपल्या नशिबापेक्षा जास्त किंवा कमी काहीच मिळत नाही. हे फक्त बोलण्यापुरते नाही तर या तत्त्वांवर मी जगते. आजूबाजूला निगेटिव्ह व पॉझिटिव्ह एनर्जी असते पण आपण स्वतः पॉझिटिव्ह असलो तर बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतात. आपल्या मेंदूवर आपला कंट्रोल असणे खूप गरजेचे आहे. विणकाम व्यतिरिक्त मला नैसर्गिक वातावरणात रमायला आवडते. एकंदरीतच फावल्या वेळात मला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात व स्वतः सह सगळ्यांना आनंदीत बघायला आवडत. 'प्रेमास रंग यावे' या मालिकेने मला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळवून दिले आहे."