झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूसने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतरही या मालिकेतील पात्र रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. या मालिकेची लोकप्रियता पाहता आता या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेव्हापासून दुसऱ्या सीझनची घोषणा झाली तेव्हापासून या मालिकेबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
देवमाणूस २ची घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. दरम्यान या मालिकेत डॉ. अजित कुमारची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड दिसणार नसल्याच्या अनेक चर्चा ऐकायला मिळत होत्या. सोशल मीडियावर देखील अनेकांनी किरण ही भूमिका आता करणार नसल्याचे सांगितले होते. पण या सर्व बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही आहे. त्यामुळे डॉ. अजित कुमारची भूमिका अभिनेता किरण गायकवाडच साकारताना दिसणार आहे. तसेच या मालिकेतील बज्याची भूमिका साकारणारा अभिनेता किरण डांगे देखील दुसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.