Join us

'मुलगी पसंत आहे' मालिकेत अभिनेता सतीश सलागरे यांची धमाकेदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 18:21 IST

Mulgi Pasant Aahe : 'मुलगी पसंत आहे' ही मालिका आता रंजक वळणावर आली असून मालिकेत शकुंतलाचा नवरा दयानंद या पात्राची एन्ट्री होणार आहे.

सन मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. त्यातलीच 'मुलगी पसंत आहे' ( Mulgi Pasant Aahe) ही मालिका आता रंजक वळणावर आली असून मालिकेत शकुंतलाचा नवरा दयानंद या पात्राची एन्ट्री होणार आहे. मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारे अभिनेता सतीश सलागरे दयानंद या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 

अभिनेता सतीश सलागरे यांनी अनेकदा खलनायकाची भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. दयानंद हे पात्र दिसायला खूप साधा सरळ आणि सज्जन असलं तरी त्याचा खरा उद्देश हा संपूर्ण सरनाईक कुटुंबाला आणि मुख्यतः तारा व श्रेयसला मुळापासून उद्धवस्त करण्याचा आहे. दयानंद ताराच्या आयुष्यातील अडचणींमध्ये आणखी भर घालण्यासाठी आला आहे. मालिकेत शकुंतला व दयानंद मिळून ताराच्या विरोधात कोणता नवा डाव रचणार हे पाहणं रंजक ठरेल. 

सध्या मालिकेत शकुंतला ताराचा छळ करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. पण तारा प्रत्येकवेळी कठीण प्रसंगातून मार्ग काढत आहे. तारा-श्रेयसला वेगळं करण्यात शकुंतला आणि दयानंद यशस्वी ठरेल का ? तारा शकुंतलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू शकेल? तारा दयानंदचा उद्देश पूर्ण होऊन देईल का ? दयानंदशी सामना करताना तारा श्रेयसला कायमचं गमावून बसेल का ? आता मालिकेत नक्की काय घडणार हे जाणून घेणे कमालीचे ठरणार आहे.