Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता समीर परांजपेला मिळाली ड्रीम कार, म्हणाला - "इतक्या वर्षांनंतर हे वर्तुळ पूर्ण झालं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:25 IST

Actor Sameer Paranjape : 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतून घराघरात पोहोचलेला तेजस म्हणजेच अभिनेता समीर परांजपेचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतून घराघरात पोहोचलेला तेजस म्हणजेच अभिनेता समीर परांजपेचं स्वप्न पूर्ण झालं आहे. आता होऊ दे धिंगाणाच्या महाअंतिम सोहळ्यात सर्वोत्कृष्ट धिंगाणेबाज कलाकार म्हणून समीरला सन्मानित करण्यात आलं. इतकंच नाही तर मारुती सुझुकीची वॅगन आर कार त्याला भेट म्हणून देण्यात आली. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर समीरने आपल्या गायनाच्या कलेने प्रेक्षकांची मनं जिंकली. 

ही अनोखी भेट स्वीकारताना समीर भाऊक झाला होता. आपली भावना व्यक्त करताना तो म्हणाला, ''आता होऊ दे धिंगाणाच्या मंचाने कायम स्मरणात राहिल अशी भेट मला दिली आहे. मला खूप भारी वाटतंय. परिवारातल्या एखाद्या सदस्याला असं सरप्राईज देणं हे कमाल आहे आणि हे फक्त स्टार प्रवाह वाहिनीच करु शकते. माझ्या बाबांना ही कार घेण्याची फार इच्छा होती. कुटुंबाच्या गरजा भागवताना बाप कायम त्याची स्वप्न बाजूला ठेवतो. माझ्या बाबांचंही हे स्वप्न तेव्हा अपूर्ण राहिलं होतं. इतक्या वर्षांनंतर हे वर्तुळ पूर्ण झालं आहे. बाबांची ड्रीमकार त्यांना आता मिळणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहाण्यासाठी मी उत्सुक आहे.''

समीरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की,''स्टार प्रवाह, सतीश राजवाडे सर, श्रीप्रसाद क्षीरसागर सर, सुमेध म्हात्रे भावा, सिद्धार्थ जाधव भावा ह्या सरप्राइजसाठी आणि मौल्यवान क्षणांसाठी खूप खूप आभार. "मुलगा" म्हणून मोठं केलंत, त्यामुळे अंगावर चढलेल्या मूठभर मासासाठी कायम तुम्हा सगळ्यांच्या ऋणात.'' समीरच्या या पोस्टवर सेलिब्रेटी आणि चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.