प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हा अभिनेता लोकांकडे भीक मागताना दिसला. रस्त्यावर झोपताना दिसला इतकंच नव्हे तर कचऱ्यात फेकलेलं अन्न खाताना दिसला. अभिनेत्याचा हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला. अभिनेत्यावर अचानक अशी वाईट वेळी का आली? याचा सर्वांना प्रश्न पडला. हा व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्यानेच याविषयी स्पष्टीकरण दिलंय. काय म्हणाला जाणून घ्या?
अभिनेत्याने भीक मागितली अन्...
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सचिन शर्माने त्याच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सचिन रस्त्यावर भीक मागत फिरताना दिसतोय. रापलेला चेहरा, मळके कपडे, अस्ताव्यस्त केस अशा अवतारात सचिनला ओळखणं कठीण झालं आहे. भिकारी झाल्याने अनेक लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. इतकंच नव्हे तर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या सचिनला पोलीस हटकताना दिसत आहेत. सचिन लोकांनी कचऱ्यात फेकलेले पदार्थ खाताना दिसतोय. अभिनेत्याची अशी अवस्था पाहून त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. पण हा व्हिडीओ शेअर करण्यामागचं कारण सचिनने सर्वांना सांगितलं आहे.
म्हणून सचिन बनला भिकारी
सचिनने व्हिडीओ शेअर करत त्यामागील हेतू स्पष्ट केला आहे. सचिन अनेकदा समाजातील घटकांच्या भूमिका साकारत कटू सत्य लोकांसमोर आणत असतो. हा व्हिडीओ शेअर करुन सचिन लिहितो, "भिकाऱ्यांना निर्णयाचं कोणतंही स्वातंत्र्य नसतं. मी जी भूमिका साकारतोय ती निभावणं कठीण आहे हे मला सुरुवातीलाच माहित होतं. परंतु माझी केशरचना केल्यावर आणि मेकअप केल्यावर माझा स्वतःवर विश्वास बसला.''
"हे लोक रोज हाच अनुभव जगत असतात, ते दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. कचऱ्यात फेकलेले पदार्थ हे लोक खाताना दिसतात. यापुढे पदार्थ कचऱ्यात फेकण्याआधी किंवा रस्त्यावर टाकण्याआधी या लोकांचा विचार करा", असा संदेश सचिनने लोकांना दिला आहे. सचिनच्या या व्हिडीओचं आणि त्याच्या अभिनयाचं लोकांनी चांगलंच कौतुक केलं आहे. सचिनने काही टीव्ही शोमध्ये याशिवाय 'स्पिल्ट्सविला' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.