देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठोस पाउले उचलत संपूर्ण देश लॉकडाउन केला, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद केल्याने देशातील लोकांसमोर आज रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच छोट्या मोठ्या उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. इतकेच नाही तर मनोरंजन क्षेत्रालाही कोरोनाचा फटका बसला. मालिकेच्या सिनेमाच्या शूटिंग बंद झाल्याने कलाकारही बेरोजगार झाले.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहची मोठी समस्या कलाकारांसमोर निर्माण झाली आहे. अशात आता करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. काहींनी तर आर्थिक संकटात सापडल्यामुळे थेट आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. मात्र हा काही पर्याय नाही. संकट हे येत राहणार यातून सुटका कशी करता येईल यावर विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे ज्या - ज्या कलाकारांनी आत्महत्या करण्याचा टोकाचे पाऊल उचलले ते नक्कीच चुकीचे असल्याचे रोनित रॉयने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
रोनित रॉयलादेखील कोरोनाचा फटका बसला आहे. आर्थिक अडचणीचा सामना त्यालाही करावा लागला आहे. मात्र तरीही हिंमत न हारता अनेकांना त्याने संंकटाच्या काळात मदतीचा हात दिला आहे.रोनित रॉयने सांगितले की, कोरोना येण्याच्या आधीपासून मी आर्थिक अडचणीत सापडलो आहे. माझा एक छोटासा व्यवसाय आहे. त्यावर माझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. जानेवारी महिन्यापासून मला पैस्यांची चणचण भासू लागली. थोडाफार सुरू असलेल्या व्यवसायावर कोरोना नावाच्या संकटाचे विरजन पडले आणि संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे माझ्याकडे आता पर्याय नाही. त्यामुळे घरातल्याच काही वस्तू विकण्याची माझ्यावर वेळ आली आहे. त्यातून मिळणा-या पैस्यांतू मला माझ्या गरजा भागवाव्या लागणार आहेत.
अनेक कलाकारांचे ९० दिवसांच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट झाले होते. त्यानुसार कलाकारांना मानधन देणे गरजेचे होते. अनेक प्रोडक्शन हाऊसनी कलाकारांचे पैसे थकवले हे चुकीचे आहे. इतके मोठे प्रो़डक्शन हाऊसने अशावेळी कलाकारांना त्यांचे मानधन तरी देणे गरजेचे होते. त्यांच्या हक्काचे पैसे होते मात्र तेही मिळाले नाहीत अशामुळे कलाकारांनी जगायचे कसे ? असे सांगत झगमगत्या दुनियेचे वास्तव देखील समोर आणले आहे.