Join us

अभिनेता प्रसाद जावडे करतो या भूमिकेसाठी जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 16:57 IST

छोट्या पडद्यावरील एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर या सामाजिक नाट्यमालिकेत भारतीय संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका प्रसाद जावडे साकारत आहे.

जेव्हा एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री पात्रांमध्ये पूर्णतः समरस होऊन अभिनय करण्याचा प्रयत्न करतो किंवा करते, तेव्हा केवळ उत्तम संवाद म्हणण्यापर्यंतच त्याची तयारी राहत नाही, तर ते संपूर्ण पात्र, संपूर्ण व्यक्तीमत्व स्वतःमध्ये आत्मसात करण्याची त्या कलाकाराची धडपड सुरू होते. छोट्या पडद्यावरील  एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर या सामाजिक नाट्यमालिकेत भारतीय संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका प्रसाद जावडे साकारत आहे. हे पात्र साकारण्यासाठी इतक्या थोर व्यक्तीमत्वाचीच आपल्याला मदत होत असल्याचे मत प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक गुणांपैकी एक म्हणजे त्यांची वाचनाची आवड. आयुष्यभर त्यांनी शिकण्याचा ध्यास कधीही सोडला नाही. बाबासाहेबांच्या याच गुणातून प्रेरित होऊन प्रसादने सुद्धा आता विविध विषयांवरची पुस्तके वाचायला सुरूवात केली आहे आणि ही चांगली सवय तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जोपासतो आहे. सध्या बाबासाहेबांबद्दल अधिकाधिक माहिती मिळवण्यात व्यग्र असलेला प्रसाद आजकाल सेटवरही दोन शॉट्सच्या दरम्यान पुस्तकांमध्ये गुंतलेला दिसतो. 

प्रसादला वाचनाची आवड पहिल्यापासून जोपासायची होती, आता या पात्रामुळे ही आवड खऱ्या अर्थाने तो जगू शकतो आहे. प्रसाद सांगतो, ''आयुष्यात धकाधकीच्या रुटीनमध्ये वाचनामुळे मनाला फार शांतता मिळते. गेल्या काही महिन्यांपासून वाचनाचा छंद पुन्हा जोपासण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी मला आता प्रेरणाही मिळते आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पात्र वठवणे हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान आहे. त्यांच्या कामाबद्दल, जीवनशैलीबद्दल आणि स्वभावाबद्दल इतके काही वाचल्यानंतर हा प्रवास मला फारच रंजक, उत्साहवर्धक आणि सोपा वाटायला लागला आहे. मी चित्रीकरणात कायमच व्यग्र असतो. तरीही, दोन शूट्सच्या मधल्या काळात मी वाचनाला वेळ देतो. सध्या मी बाबासाहेबांचे 'वेटिंग फॉर अ व्हिसा' हे आत्मचरित्र वाचतो आहे आणि या पुस्तकातल्या कथांनी मला अंतर्मुख केले आहे.''

 

हे पात्र वठवण्यासाठी प्रसादने केलेल्या अभ्यासातून त्याला जे काही मिळाले, त्याबद्दल बोलताना प्रसाद सांगतो, ''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याबद्दल इतके काही वाचताना मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या घरात आणि त्यांच्या आयुष्यात आधुनिक संस्कृतीचा मनोमन स्वीकार केला होता. त्यांनी स्वतःला केवळ शिकण्यामध्ये बांधून घेतले नाही, तर शिकण्यातून मिळालेली मूल्ये त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात अमलातही आणली. यामुळे आधुनिक कल्पना आणि चालीरितींसोबतच आपल्या मूळ संस्कृतीशी प्रामाणिक राहण्याची प्रेरणा मला यामुळे मिळाली.''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यासारखी थोर व्यक्ती, त्या व्यक्तीचे आयुष्य पात्रातून उभे करताना प्रसाद जावडे एक अभिनेता म्हणून आणि एक माणूस म्हणून वाढला आहे. या मालिकेमुळे प्रेक्षकांचाही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्की बदलेल, अशी आशा आहे.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर