सध्या सगळीकडे वेडिंग सीझन सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अभिनेत्री अनुजा चौधरी आणि अभिनेता संकेत मोडक यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.
अनुजा आणि संकेत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांनी सात फेरे घेतले. लग्नासाठी अनुजा आणि संकेतने पारंपरिक लूक केला होता. अनुजाने निळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. तर संकेतने धोतर परिधान केलं होतं. अनुजानेआयुष्यातील या खास क्षणाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. "स्वामींच्या आणि महादेवाच्या कृपेने जुळून आल्या रेशीमगाठी! शुभमंगल सावधान", असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे. तिच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुजा पेशाने वकील आहे. त्यासोबतच ती मॉडेलिंगही करते. 'अबोली' या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. अनेक गाण्यांमध्ये ती झळकली आहे. संकेतही थिएटर आर्टिस्ट आहे. अनेक नाटकांमध्येही त्याने काम केलं आहे. 'फसक्लास दाभाडे' या सिनेमात तो दिसला होता.