Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित श्वेतचंद्र दिसणार प्रतापच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 10:25 IST

मालिकेतील, 'प्रताप' या मुख्य भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अभिजित श्वेतचंद्रला पाहण्याची संधी मिळणार आहे. 

छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला आणखी एक नवीन मालिका येत आहे. 'साजणा' असं या नव्या मालिकेचं नाव आहे. टीजर प्रदर्शित झाल्यापासूनच, मालिकेविषयी सर्वांच्याच मनात खूप उत्सुकता आहे. मालिकेतील, 'प्रताप' या मुख्य भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अभिजित श्वेतचंद्रला पाहण्याची संधी मिळणार आहे. 

पंचवीस वर्षांच्या आसपास वय असलेला एक उमदा तरुण, म्हणजे 'साजणा' या मालिकेतील 'प्रताप'. प्रताप शेतीक्षेत्रातील पदवीधर आहे.आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग गावाच्या भल्यासाठी करण्याची या तरुणाची महत्वाकांक्षा आहे. म्हणूनच, पदवीधर असूनदेखील, गावात राहण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. गावच्या मातीची, घराची व गावकऱ्यांची त्याला असलेली ओढ या मालिकेत पाहता येईल. देखणा चेहरा, सुडौल बांधा आणि गावाविषयी त्याच्या मनात असलेली आपुलकी, यांच्यामुळे तो गावकऱ्यांना सुद्धा आपलासा वाटतो. या प्रतापची प्रेमकथा सोमवारपासून 'झी युवा'वर पाहता येईल. 

ही भूमिका साकारणारा अभिजित श्वेतचंद्र, भूमिकेविषयी बोलताना म्हणतो; "एखादी उत्तम प्रेमकहाणी असलेल्या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील प्रेमकथा, ही इतर कथांपेक्षा वेगळी व आकर्षक असल्याने, ही भूमिका स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला. मी माझ्यापरीने संपूर्ण प्रयत्न केले आहेत व भूमिका प्रेक्षकांना कशी वाटते, याविषयी मला प्रचंड उत्सुकता आहे. प्रेम ही नाजूक भावना, अभिनयातून योग्यप्रकारे मांडता येणं, हे मोठं आव्हान ठरतं. प्रतापचं पात्र माझ्याशी मिळतंजुळतं असल्याने, हे आव्हान स्वीकारणं फार सोपं व आनंद दायक वाटलं."