मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालिका आणि नाटकविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शलाका पवार (shalaka pawar) यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे. शलाका यांचा दादरला भीषण अपघात झाला. इतकंच नव्हे त्यांच्या पायाला १८ टाके पडले. परंतु तरीही आधीच ठरलेलं असल्याने शलाका यांनी नाटक आणि मालिकेचं शूटिंग सुरुच ठेवलं. शलाका यांनी अपघातानंतरही काम सुरु ठेवल्याने चाहत्यांची चांगलं कौतुक केलं आहे. शलाका यांचा अपघात कसा झाला? जाणून घ्या
महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडीमुळे झाला अपघात
म.टा.ने दिलेल्या वृत्तानुसार, शलाका पवार काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुचाकीवर बसून मुलीसोबत ठाण्याला प्रवास करत होत्या. यावेळी महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीमधील लोखंडाची एक जड वस्तू अचानक रस्त्यावर पडली. ती वस्तू शलाका यांच्या पायाला जोरात घासून गेली त्यामुळे त्यांचा अपघात झाला. पुढे शलाका यांनी विक्रोळीतील महापालिकेच्या रुग्णालयात उपाचार केले. डॉक्टरांनी शलाका यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. परंतु आधीच शब्द दिला असल्याने आणि दुखापतीमुळे इतरांना अडचण नको, हा विचार डोळ्यासमोर ठेऊन शलाका यांनी मालिकेचं चित्रीकरण सुरु ठेवलं.
शलाका सध्या 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकात अभिनय करत आहेत. या नाटकात सागर कारंडे प्रमुख भूमिकेत आहे. नाटकाचेही प्रयोग आधीच लागल्याने शलाका यांनी दुखापत झाली असूनही रंगभूमीवर काम केलं. शलाका यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांच्या हालचालींमध्ये थोडा बदल करुन नाट्यप्रयोग करण्यात आला. अशाप्रकारे शलाका यांनी शो मस्ट गो ऑन म्हणत अभिनय करणं थांबवलं नाही. शलाका यांचं कामाप्रती असलेलं डेडिकेशन बघून अनेकांनी त्यांंचं कौतुक केलं, याशिवाय काळजी घेण्याचाही सल्ला दिला. शलाका पवार यांनी 'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाच्या आईची भूमिका साकारली होती.