Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाने पटकावले दोन पुरस्कार, म्हणाली- मी खूपच....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 07:00 IST

आई कुठे काय करते मालिकेतील संजनाने म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा दोन पुरस्कार पटकावले.

यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा नुकताच थाटात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात आई कुठे काय करते मालिकेतील संजनाने म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने दोन पुरस्कार पटकावले. स्टार प्रवाहची इन्स्ट स्टार आणि सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस या दोन पुरस्कारांची रुपाली मानकरी ठरली. आई कुठे काय करते मालिकेतून संजना हे पात्र घराघरात पोहोचलं आहे. संजनाचं स्टाईल स्टेटमेण्ट, तिच्या साड्या आणि खास करुन तिच्या दागिन्यांची महिला प्रेक्षक वर्गात प्रचंड क्रेझ आहे. हे पात्र ग्लॅमरस दिसावं यासाठी मालिकेची संपूर्ण टीम मेहनत घेतच असते. लेटेस्ट फॅशन ट्रेण्डकडे बारकाईने लक्ष देत नवनवे ट्रेण्ड संजना पात्र साकारताना कसे उपयोगात आणता येतील याकडे तिचा विशेष कल असतो.

 यासोबतच रुपाली सोशल मीडियावरही सक्रीय असते. फोटोशूट आणि रिल्सच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबतचं नातं अधिकाधिक घट्ट कसं होईल याचा प्रयत्न करत असते. त्यामुळेच स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार आणि सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस हे दोन पुरस्कार रुपालीला देण्यात आले.

पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना रुपाली म्हणाली, ‘यंदा आनंद द्विगुणीत झालाय. स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार आणि सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. हे दोन्ही पुरस्कार अनपेक्षित होते. स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार ही कॅटेगरी पहिल्यांदाच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात होती. या नव्या पुरस्काराची सुरुवात माझ्यापासून झाली याचा आनंद आहे. स्टार प्रवाह आणि इन्स्टाग्रामने दिलेल्या या सन्मानाबद्दल मी खूपच आभारी आहे.

या पुरस्कारामुळे आता जबाबदारी वाढली आहे. आपण काय पोस्ट केलं पाहिजे? लोकांपर्यंत काय पोहोचलं पाहिजे? याकडे आता अधिक लक्ष देईन. माझे रिल्स, फोटोज आणि व्हिडिओज तर मी पोस्ट करतेच यापुढेही असाच छान कन्टेण्ट देण्याचा प्रयत्न करेन. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस हा पुरस्कारही खूपच खास आहे. संजना हे पात्र खूपच स्टायलिश आहे. लेखक आणि दिग्दर्शकाच्या डोक्यात संजना कशी वागेल? कशी दिसेल? हे पक्क ठरलेलं असतं. हे पात्र साकारताना मी दिलेल्या सुचनांचाही आदर राखला जातो हे उल्लेखनिय आहे. म्हणूनच तर संजनाची साडी, तिचे दागिने महिला वर्गात लोकप्रिय ठरत आहेत.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकारुपाली भोसले