तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेल्या 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट दिसत आहे. 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याचीही 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत एन्ट्री झाली आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत अप्पांची भूमिका साकारून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेले अभिनेते किशोर महाबोले 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेत ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. मालिकेच्या प्रोमोमध्ये त्यांची झलक पाहायला मिळत आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान स्वानंदीची भूमिका साकारत आहे. या स्वानंदीच्या वडिलांची भूमिका किशोर महाबोले साकारताना दिसणार आहेत.
'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका येत्या ११ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान, सुबोध भावे, किशोर महाबोले, किशोरी आंबिये, राज मोरे, पूर्णिमा डे अशी स्टारकास्ट दिसणार आहे. तेजश्री आणि सुबोधच्या या नव्या मालिकेसाठी चाहते उत्सुक आहेत.