Join us

संत सखूबाईच्या जीवनावर आधारित मालिका लवकरच येतेय भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:33 IST

Sakha Maza Panduranga Serial : 'सखा माझा पांडुरंग' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच सोशल मीडियाद्वारे या मालिकेचा टीझर प्रेक्षकांसमोर आला.

'सखा माझा पांडुरंग' (Sakha Maza Panduranga Seria) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच सोशल मीडियाद्वारे या मालिकेचा टीझर प्रेक्षकांसमोर आला. पहिल्यांदाच महिला संत सखुबाई यांच्या जीवनावर आधारित मालिका 'सन मराठी' घेऊन येत आहे. संत सखुबाई या विठ्ठलाच्या निस्सीम भक्त होत्या. 

महाराष्ट्र राज्यातील थोर भक्तांमध्ये त्यांची गणना केली जाते. समोर आलेल्या टीझरमध्ये विठ्ठलासह एक लहान मुलगी दिसत आहे. त्यानुसार संत सखुबाई यांच्या बालपणापासून या जीवनचरित्राची सुरुवात होणार असल्याचे दिसून येत आहे. मालिकेत संत सखुबाई यांच्या भूमिकेत कोणती बालकलाकार  दिसणार? त्याचबरोबर 'सन मराठी' संत सखुबाई यांच्या काळातील गोष्ट छोट्या पडद्यावर कशी मांडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते.

संत सखुबाई या विठलाच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांची महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध भक्तांमध्ये गणना होते. सखुबाई स्वभावाने जितक्या विनम्र होत्या त्याच्या विपरीत त्यांची सासू आणि नवरा स्वभावाने तितकेच दुष्ट होते असे म्हटले जाते. एकंदरीतच ही गोष्ट तरुणांसह वयोवृद्धांच्या पसंतीस उतरेल. मुख्यतः महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातील मंडळी बरीच आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाला ही नवी गोष्ट पाहायला नक्कीच आवडेल. आजपर्यंत आपण अनेक थोर संत यांच्यावर आधारित पुस्तक वाचली किंवा चित्रपटांद्वारे त्यांचा प्रवास अनुभवला आहे. पण खरेच ही एक कौतुकाची बाब आहे की, पाहिल्यांदाच छोट्या पडद्यावर महिला संत सखूबाईंचे जीवनचरित्र पाहायला मिळणार आहे.