Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्याशा गावातल्या गुंजाची प्रेरणादायी गोष्ट सांगणारी नवीन मालिका 'कुन्या राजाची गं तू रानी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 13:53 IST

Kunya Rajachi Ga Tu Rani : 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेत अभिनेता हर्षद अतकरी आणि नवोदित अभिनेत्री शर्वरी जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

स्टार प्रवाहवर १८ जुलैपासून नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतं नाव आहे कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani). डोंगरपाड्यासारख्या छोट्याश्या गावात वाढलेल्या मात्र मोठी स्वप्न पहाणाऱ्या गुंजाची प्रेरणादायी गोष्ट या मालिकेतून पहायला मिळेल. दुर्वा आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता हर्षद अतकरी या मालिकेत कबीर ही व्यक्तिरेखा साकारत असून नवोदित अभिनेत्री शर्वरी जोग गुंजाची भूमिका साकारणार आहे. 

कुन्या राजाची गं तू रानी मालिकेत गुंजा डोंगरपाड्याच्या निसर्गासारखी अगदी निरागस. स्वत: आनंदात राहून इतरांनाही भरभरुन आनंद देणाऱ्या गुंजाला शिकून खूप मोठं व्हायचं आहे आणि आपल्या आईला शहरात घेऊन जायचं आहे. एकीकडे गुंजाची निरागस स्वप्न तर दुसरीकडे करिअरवर भरभरुन प्रेम करणारा कबीर. पेश्याने पत्रकार. एका मध्यमवर्गी घरात जन्मलेला, खडतर प्रवास करून मोठा झालेला आणि पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करून खूप कमी वेळात महत्वाचे स्थान मिळवलेला धडाडीचा पत्रकार. त्याला समाजात बदल घडवायचा आहे. शोषितांचा लढा लढायचा आहे, आणि त्यासाठी तो कुठल्याही प्रकारचा खडतर मार्ग स्वीकारायला तयार आहे. अश्याच एका बातमीच्या मागावर असताना कबीर आणि गुंजाची भेट होते. मात्र गावाच्या एका कठोर निर्णयामुळे दोघांच्याही आयुष्याला नवी कलाटणी मिळते. तिथूनच सुरुवात होते नव्या नाट्याची. अतिशय उत्कंठावर्धक अशी मालिकेची गोष्ट असणार आहे.

याबद्दल स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेची वातावरण निर्मिती, तिचा बाज आणि कथा ही इतर मालिकांपेक्षा वेगळी आहे. गुंजा या अतिशय धडाडीच्या मुलीची ही गोष्ट आहे तिला कालांतराने एका प्रामाणिक मुलाची साथ मिळते. तोपर्यंत हा प्रवास बघणं खूप उत्सुकता निर्माण करेल. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच दर्जेदार मालिका सादर करते, ही मालिका तशीच आहे. कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये असं सांगणारी नायिका या मालिकेतही पहायला मिळेल.’हर्षद अतकरी आणि शर्वरी जोग सोबतच वृंदा अहिरे, समिधा गुरु, वसुधा देशपांडे, संजय खापरे, पूर्णिमा डे, राजन भिसे, वनश्री पांडे अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेतून भेटीला येईल. कुन्या राजाची गं तू रानी १८ जुलैपासून सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.

टॅग्स :स्टार प्रवाह