Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जुळली गाठ गं' मालिकेत मोठा ट्विस्ट, कुस्तीच्या आखाड्यात रंगणार थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:47 IST

‘जुळली गाठ गं’ (Julali Gath Ga Serial) या मालिकेत लवकरच सावी आणि धैर्य यांचं नातं मैत्रीच्या पुढे जाणार आहे.

'सन मराठी'वरील ‘जुळली गाठ गं’ (Julali Gath Ga Serial) या मालिकेत लवकरच सावी आणि धैर्य यांचं नातं मैत्रीच्या पुढे जाणार आहे. अखेर कुस्तीच्या आखाड्यात धैर्य सावीला देणार प्रेमाची कबुली. सावीच्या मदतीसाठी धैर्य कुस्तीच्या आखाड्यात लढणार जीवाची बाजी. सध्या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूरच्या कुस्ती आखाड्यात सुरू आहे. 

सावी आणि भाऊंसमोर दामिनी मुजुमदार नवं आव्हान उभं करते, आणि या आव्हानाला उत्तर देण्यासाठी धैर्य सावीला मदत करतो. शाळेसाठी लागणारी रक्कम ऊभी करण्यासाठी धैर्य कुस्तीच्या स्पर्धा भरवण्याची कल्पना देतो. पण ऐनवेळी दामिनी या स्पर्धेत अडथळे निर्माण करते. अखेर सावीला या अडचणीतून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून धैर्य स्वतः आखाड्यात उतरतो. आता धैर्य कुस्तीची स्पर्धा आणि पर्यायाने सावीचं मन जिंकू शकेल का? सावी धैर्यचं प्रेम स्विकारेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.   

जवळपास १०-१२ तास मी मातीत होतो - संकेत निकम

मालिकेत धैर्य हे पात्र साकारणारा अभिनेता संकेत निकम मालिकेतील नव्या ट्विस्टबद्दल म्हणाला की, '''जुळली गाठ गं' या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत आहेत. नुकतंच मालिकेच्या निमित्ताने मला कोल्हापूरच्या आखाड्यात कुस्ती खेळण्याचं भाग्य लाभलं. मालिकेमुळे कुस्ती हा खेळ देखील मला जवळचा वाटू लागला. पैलवान कुस्तीमध्ये इतका का गुंतून जातो हे समजलं. मी जेव्हा कुस्तीचे सीन करत होतो, तेव्हा फाईट मास्टर आणि वस्ताद यांनी मला खूप मदत केली. जवळपास १०-१२ तास मी मातीत होतो. जे खेळाडू माझ्यासोबत होते, ते माझ्यापेक्षा धिप्पाड होते आणि त्यांना मला हरवायचं होतं. त्यामुळे सुरुवातीला थोडं दडपण आलं, पण मला आत्मविश्वास होता की, मी हे सीन करू शकतो. आखाड्यातील शूटिंग ३ दिवस चाललं आणि मी ते यशस्वीरित्या पूर्ण केलं. हा अनुभव खूप वेगळा आणि मजेशीर होता."

"आता प्रेक्षकांना धैर्यची एक नवी बाजू पाहायला मिळणार आहे. बरेच प्रेक्षक सोशल मीडियावर विचारतात की सावी आणि धैर्य यांची गाठ कधी जुळणार? तर मालिकेच्या चाहत्यांना मला सांगायला आवडेल की, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच मी सावीसमोर माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे. त्यामुळे हा खास भाग तुम्ही चुकवू नका.", असे संकेत निकम म्हणाला.