Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tanushree Dutta Controversy : पीरियड्समध्ये इरिटेशन तर होतेच...! ‘हॉर्न ओके प्लीज’चे निर्माते सामी सिद्दकी यांचे लाजीरवाणे वक्तव्य!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 18:56 IST

तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादात आता ‘हॉर्न ओके प्लीज’चे निर्माते सामी सिद्दकी यांचीही एन्ट्री झालीय. तनुश्री वादावर सामी सिद्दकी यांनी अतिशय लाजीरवाणी प्रतिक्रिया दिली आहे.

तनुश्री दत्तानाना पाटेकर वादात आता ‘हॉर्न ओके प्लीज’चे निर्माते सामी सिद्दकी यांचीही एन्ट्री झालीय. तनुश्री वादावर ‘टाईम्स नाऊ चॅनल’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान सामी सिद्दकी यांनी अतिशय लाजीरवाणी प्रतिक्रिया दिली आहे. त्या दिवशी काय झाले होते, असा प्रश्न चॅनलचा रिपोर्टर सामी यांना केला. यावर सामी यांनी जे उत्तर दिले, ते पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ‘मी तुम्हाला खरे सांगू इच्छितो़ माझ्या मते, त्यादिवशी तनुश्रीचे पीरियड्स (मासिक पाळी) आले असावेत आणि कदाचित याचमुळे जराशा स्पर्शाने ती इरिटेड झाली असावी. पण मला पूर्णपणे माहित नाही. पण हो, त्यादिवशी काही तरी झाले होते,’असे सामी सिद्दकी या प्रश्नावर म्हणत आहेत.

 ‘त्या दिवशी तनुश्री रागाने आपल्या व्हॅनमध्ये निघून गेली आणि पुन्हा परतली नाही़ ते पाहून ही इतका ड्रामा का करतेय. जा आणि तिला परत बोलव. नाहीतर माझे खूप नुकसान होईल, असे मी तिचा सेक्रेटरी जमशेदला म्हणालो होतो. इतकेच नाही तर नाना एक सिनीअर अभिनेता आहे. दोन दिवसाचे उरलेले शूटींग संपव, असे तनुश्रीलाही मी समजावले होते. त्यावेळी मी आणि नाना वेगवेगळा डान्स करू, अशी अट तिने ठेवली होती. यावर हे कसे शक्य आहे, असा प्रश्न मी तिला केला होता, ’असेही सामी या चॅनलशी बोलताना म्हणत आहेत.

२००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याच्या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपाने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे, दिवसागणिक या वादाला एक वेगळेच वळण मिळतेय. या वादात अनेकजण नाना पाटेकर यांची पाठराखण करणारे आहेत, तसेच तनुश्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारेही आहेत. आता तर हा वाद केवळ बॉलिवूडमधील ‘कास्टिंग काऊच’पुरता मर्यादीत न राहता त्याला राजकीय रंग मिळू पाहतोय. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर झालेल्या घटनेनंतर नाना पाटेकर यांनी मनसेकडून आपल्याला धमकावले होते, या तनुश्रीच्या वादानंतर आता मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, तनुश्री दत्ताला ‘बिग बॉस’च्या घरात पाठवाल तर आम्ही बिग बॉसचे घर उद्धवस्त करू, अशी धमकी मनसेने दिली आहे.

 

टॅग्स :तनुश्री दत्तानाना पाटेकर