‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ (Swarajya Saudamini Tararani) या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्वरदा ठिगळे (Swarda Thigale ) हिने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. होय, स्वरदाने मुंबईत तिचं स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. तिने सोशल मीडियावर घराचे फोटो आणि खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.
‘माझं स्वत:चं कायमचं सुखाचं ठिकाण, माझ सुंदर घर. मुंबईत घराचं स्वप्न, आपली ओळख बनवण्याचं स्वप्न... आणि स्वप्न आता सत्यात उतरत आहे. स्वत:वर विश्वास ठेवा, सगळं काही ठिक होईल’, अशी सुंदर पोस्ट लिहित स्वरदानं घराचे दोन फोटो शेअर करत आहे. घराचा ताबा घेतानाचा एक फोटो तिने शेअर केला आहे. यात तिचे आईबाबाही दिसत आहे.
स्वत:चं नवं घर घेतल्यानंतर स्वरदाच्या चेहऱ्यावरचाआनंद पाहण्यासारखा आहे. शिवाय मुलीनं इतक्या कमी वयात स्वत:चं घर घेतल्याचं अभिमानही तिच्या आई वडीलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.
स्वरदा ही टेलिव्हिजची लोकप्रिय अभिनेत्री. स्वरदानं तिच्या अभिनयानं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या सहज सुंदर, उत्कृष्ट संवादाने तिनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत तिने ताराराणींची प्रमुख भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं.
स्वरदानं ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेआधी ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने शुभ्राची भूमिका साकारली होती. सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या हिंदी मालिकेतही तिनं काम केलं आहे. थोडं तुझं थोडं माझं या सिनेमातून तिनं सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.