बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर सगळ्यांनाच धक्का बसला. सुशांतने त्यांच्या ५० स्वप्नांची यादी तयार केली होती आणि ते सर्व त्याला करुन पाहायचे होते. मात्र आता त्याची स्वप्न अपूर्णच राहिली. मात्र सुशांतची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक अभिनेत्री आणि त्याची मैत्रीण पुढे सरसावली आहे. सुशांतची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार तिने केला आहे.२०१९मध्ये सुशांतने त्याच्या स्वप्नांची एक यादी सोशल मीडियावर शेअर केली होती. यामधील काही स्वप्न त्याने पूर्ण केले होती. मात्र त्यातील बरीच स्वप्ने अर्धवट राहिली आहेत. ही स्वप्ने त्याची मैत्रीण आणि दिल बेचारा चित्रपटातील सहकलाकार संजना सांघी पूर्ण करणार आहे. तिने सोशल मीडियावर सुशांतसाठी एक पोस्ट शेअर करत तुझी स्वप्न मी पूर्ण करेन असे म्हटले आहे.
संजना सांघीने सोशल मीडियावर सुशांतचे फोटो शेअर करत म्हटले की, वेळेसोबत जखमाही भरुन निघतात,असं ज्याने म्हटलं आहे ते चूक आहे. उलट त्या जखमा प्रत्येकवेळी पुन्हा उघड्या पडतात. आयुष्यात कायम लक्षात राहतील असे प्रत्येक क्षण रक्ताप्रमाणे पुन्हा वाहू लागतात. आता पुन्हा एकत्र खळखळून हसता येणार नाही, काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. पण हे दु:ख पचवण्यासाठी आपला चित्रपट काय तो उपाय आहे. निदान तेच काय या क्षणी सगळ्यांसाठी भेटवस्तू आहे.
संजना पुढे म्हणाली की, मी तुला वचन देते तुझी अपूर्ण राहिलेली स्वप्न मी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. जी तुझी इच्छा होती, ती मी पूर्ण करेन. मात्र तू वचन दिले होतेस की ही स्वप्न आपण एकत्र पूर्ण करु. परंतु आता तुझ्याशिवाय मला ही स्वप्न पूर्ण करायची आहेत.