Join us

रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:28 IST

" कृपा करून हे बघा", सुमीत राघवनने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांना टॅग केला 'हा' व्हिडीओ

रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुककोंडीचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. शिवाय यामुळे अनेकांची गैरसोय सुद्धा होते. यावर वेगवेगळ्या माध्यमातून लोक व्यक्त होत असतात. कलाकार मंडळी देखील अशा सामाजिक प्रश्नांवर सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवनने आता याच मुद्द्यावर आपला स्पष्ट रोष व्यक्त केला आहे. त्याने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून एक महत्त्वाचा उपाय सुचवला आहे.

सुमीत राघवन आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर 'Digital Innova Africa' या पेजवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे.  हा व्हिडीओ त्यानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलाय. या व्हिडीओमध्ये जर्मनीमधील एका खास तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली आहे. या तंत्रज्ञानानुसार, फक्त दगडाची पावडर (क्रश्ड ग्रॅनाइट) वापरून असा रस्ता तयार केला जातो. जो काही मिनिटांत पावसाचे पाणी शोषून घेतो. यामुळे रस्त्यावर पाणी साठत नाही आणि खड्डे पडण्याची शक्यता कमी होते.

सुमीतने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, "रस्त्यावरची कुत्री, कबुतरं, हिंदी सक्ती यापेक्षा आपल्या देशात आणि राज्यात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कृपा करून हे बघा". या व्हिडीओखालील कमेंट्समध्येही त्याने "वर्षानुवर्षे हे सांगतोय... कृपया ऐका..." असे म्हटले.

सुमीतने या महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधल्यामुळे अनेक नेटिझन्सनी त्याच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. देशातील पायाभूत सुविधा सुधारण्याची नितांत गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, हजारो प्रतिक्रिया आल्या, नागरिकांनीही आपला रोष व्यक्त केला आहे.

टॅग्स :सुमीत राघवनदेवेंद्र फडणवीसनितीन गडकरी