Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुलोचना दीदींना पुढच्या जन्मीदेखील व्हायचंय अभिनेत्री!, वाचा काय म्हणाल्या होत्या त्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 21:33 IST

Sulochana Latkar: सुलोचना दीदी यांच्या निधनामुळे सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. सुलोचना दीदींनी मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटांतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे आज निधन झाले आहे. वृद्धापकाळाने निधन झाल्याचे सांगितले जात असून मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ९४ वर्षाच्या होत्या. सुलोचना दीदी यांच्या निधनामुळे सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. सुलोचना दीदींनी मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटांतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. कलाविश्वात ७५ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने सुलोतना दीदींनी लोकमतला खास मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी त्यांना पुढच्या जन्मीदेखील अभिनेत्री व्हायचं असल्याचं म्हटलं होतं.

लोकमतला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा सुलोचना लाटकर यांना विचारलं की पुढच्या जन्मीपण तुम्हाला अभिनेत्री व्हायला आवडेल का?, त्यावर लगेचच त्या हो म्हणाल्या. सुलोचना दीदी याबद्दल पुढे म्हणाल्या की, हा व्यवसाय माझ्यासाठी खूप प्रिय आहे. पुढच्या जन्मात सुद्धा देवाने मला याच व्यवसायात ठेवावे. 

तंबूतले चित्रपट पाहण्यासाठी जायचे आणि...

याच मुलाखतीत त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल म्हटले की, मी शाळेत कधीच वेळेवर जायचे नाही. खेड्यातील आयुष्यबाबत तुम्हाला तर माहिती आहे. तंबूतले चित्रपट यायचे मी ते मावशीसोबत बघायला जायचे. मी पडद्याच्याजवळ अंथरुण घालून बसायचे, मला वाटायचे जितक्या जवळ बसू तितके चांगले दिसले. मध्ये-मध्ये जाऊन पडद्याच्या मागेही बघायचे, मला वाटायचे तिथं माणसं आहेत, पण मागे तर कुणीचं नसायचं. पण त्यावेळी माझ्या डोक्यात चित्रपटा जायचे असे काही नव्हते. बेनाडीकर वकील होते, ते एकदा माझ्या वडिलांना भेटले. माझे वडील त्यांना म्हणाले, आता या मुलीचे काय करायचे, ही शाळेतदेखील जात नाही आणि घरातली कामही करत नाही. त्यावर वकील म्हणाले, आपण हिला चित्रपटात पाठवू. 

पहिला पगार होता फक्त ३० रुपयेपुढे त्या म्हणाल्या, बेनाडीकर वकील हे मास्तर विनायकांचे शाळेपासूनचे मास्तर होते. विनायकराव नेहमी त्यांच्याकडे भेटायला यायचे. एक दिवस मला त्यांनी विनायकरावांच्या पुढे नेऊन उभे केले. त्यांनी माझ्याकडे पाहिलेदेखील नाही आणि बेनाडीकरांना म्हणाले हिला एक तुमचे पत्र देऊन कोल्हापूरला पाठवून द्या. अशा पद्धतीने मी कोल्हापूरला आले. त्यांच्या कंपनीत गेले. मग मी भालजी पेंढारकरकडे कामाला लागेल. ती तिथे नोकरीला लागले तेव्हा मला ३० रुपये पगार होता. माझी खऱ्या अर्थाने सुरुवात तिथूनच झाली.  

टॅग्स :सुलोचना दीदी