Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आईला कॅन्सर आहे समजल्यावर सलमानने...", सुधा चंद्रन यांनी सांगितला 'भाईजान'चा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:47 IST

तो माणूस कमाल आहे..., सुधा चंद्रन यांनी केलं सलमानचं कौतुक

प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी नुकताच सलमान खानबद्दल एक किस्सा सांगितला. एका मुलाखतीत त्यांनी आपला सिनेसृष्टीतील ४० वर्षांचा प्रवास उलगडला. यावेळी त्यांनी बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या दयाळू स्वभावाचे कौतुक केले. सलमानने कठीण काळात केवळ मदतीचा हातच पुढे केला नाही, तर माणुसकीचे उत्तम उदाहरणही मांडले अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काय आहे तो किस्सा?

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सुधा चंद्रन सलमानबद्दल म्हणाल्या, "तो माणूस कमाल आहे. मला आठवतंय माझी आई रुग्णालयात होती आणि मी सलमानच्याच एका सिनेमाचं शूट करत होते. आता त्याला हे आठवत नसेल पण एकदा सेटवर मी टीमसोबत आरामात जेवत होते. तेव्हा सलमानचा असिस्टंट आला आणि त्याने मला 'सलमानने तुम्हाला बोलवलंय' असं सांगितलं. मी गेले आणि सलमानला 'सर, काही गडबड आहे का?' असं विचारलं. तेव्हा तो म्हणाला, 'मी असं ऐकलं की तुमच्या आईला कॅन्सर आहे. काही मदत हवीये का?'

त्या पुढे म्हणाल्या, "मला धक्काच बसला. तुम्हाला कसं कळालं? असं मी त्याला विचारलं. तर तो म्हणाला, 'ते महत्वाचं नाही. तुम्हाला मदत हवीये का? जर गरज असेल तर नक्की फोन करा. मी तुमच्यासाठी हजर आहे'.

"तो सलमान भाई आहे. हे मी नेहमी लक्षात ठेवेन. कदाचित त्याला हे आठवतही नसेल. त्याच्या आयुष्यात असे अनेक लोक आले असतील ज्याला त्याने मदत केली असेल..पण त्या दिवशी माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर आणखी वाढला." असंही त्या म्हणाल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Salman offered help to Sudha Chandran when her mother had cancer.

Web Summary : Sudha Chandran revealed Salman Khan offered help during her mother's cancer. He learned about her mother’s illness and offered assistance, showcasing his kindness and leaving a lasting positive impression on her.
टॅग्स :सलमान खानसुधा चंद्रनबॉलिवूड