Join us
Daily Top 2Weekly Top 5

इतका त्रास होऊनही सुबोधने केले या सिनेमाचे शूट पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 15:04 IST

सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर 'लग्न' या विषयावर फिरतो.

दातदुखीचा त्रास प्रत्येकांना कधी ना कधी होतोच, पण त्याच्या वेदना असह्य झाल्या तर कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. अगदी त्याचा मुळापर्यंत उपचार केल्याशिवाय या वेदना थांबत नाही. असच काहीसं दुबईत 'शुभ लग्न सावधान' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सुबोध भावेसोबत झालं होतं. त्यासाठी त्याने दुबईतील एका दंतचिकित्सकाकडे त्यावर तात्पुरते उपचारदेखील घेतले होते. पण काही केल्याशिवाय त्याचे दुखणं काही थांबत नव्हते. त्यामुळे, सिनेमाचे शुटींग वेळापत्रकच विस्कळीत होणार होते. मात्र सुबोधने, आपल्या दातामुळे सर्वांची गैरसोय करण्यापेक्षा शूट लवकर आटपण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दातदुखीचे कोणतेही चिन्ह चेहऱ्यावर न आणता, त्याने आपला अभिनय चोख बजावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. 

सिनेमाचे दिग्दर्शक समीर सुर्वे आणि कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांनीदेखील त्याला साथ देत, सिनेमाचे चित्रीकरण नियोजित वेळेपेक्षा एक दिवस आधी पूर्ण करत, सुबोधला मोकळे केले. त्यांनतर सुबोधने थेट मुक्काम पोस्ट पुणे गाठत आपल्या दुखऱ्या दातावर उपचार घेतले. सुबोधच्या या 'दात'दुखीवर त्याने अशाप्रकारे केलेली ही मात खरंच दाद देण्यासारखीच आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, यात अभिनेत्री श्रुती मराठेची देखील प्रमुख भूमिका आहे.डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे.  लग्नसंस्थेवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमधून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांची रेलचेल या चित्रपटात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर 'लग्न' या विषयावर फिरतो. लग्नाबद्दलचे विविध लोकांचे मतमतांतरे यात आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक ख्रिश्चनधर्मीय लग्नदेखील यात आपणास दिसून येत आहे. तसेच लग्नापासून दूर पळत असलेल्या नायकाची प्रेमाबद्दलची परिभाषादेखील यात पाहायला मिळते. एकंदरीतच हा ट्रेलर पाहताना 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा संपूर्णतः कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याची जाणीव होते.

टॅग्स :सुबोध भावे शुभ लग्न सावधान