Join us

काही दिवसांपूर्वीच झालं होतं नितीन देसाईंच्या लेकीचं लग्न; सुबोध भावे म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:07 IST

Nitin desai कर्जतमध्ये असलेल्या त्यांच्या ND स्टुडिओ येथे त्यांनी त्यांचं जीवन संपवलं.

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जतमध्ये असलेल्या त्यांच्या ND स्टुडिओ येथे त्यांनी त्यांचं जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे. यामध्येच अभिनेता सुबोध भावे याने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सुबोध भावे आणि नितीन देसाई यांची बऱ्याच काळापासून मैत्री होती. सुबोधच्या बालगंधर्व या सिनेमाचं कला दिग्दर्शन नितीन देसाईंनी केलं होतं त्यामुळे त्यांच्या निधनामुळे सुबोधला धक्का बसला आहे. याविषयी त्याने 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. 

काय म्हणाला सुबोध भावे?

"खरं तर नितीन देसाई लढवय्या होता. अनेक कठीण प्रसंगांना तो सामोरा गेला होता. दोन वर्षांपूर्वी त्याच्या स्टुडिओला आग लागली त्यातूनही तो बाहेर पडला. त्यामुळे तो संकटांनी डगमगून जाणारा नव्हता. मोठी स्वप्न पाहायची आणि मेहनत करुन ती पूर्ण करायची हे आम्ही कलाकार नितीनकडे पाहून शिकलो. प्रभातच्या काळानंतर स्वतःचा स्टुडिओ असणारा नितीन हा एकमेव निर्माता होता. अनेक उत्तम कलाकृतींचा तो भाग होता आणि त्याच्या कला दिग्दर्शनामुळे त्या पडद्यावर आणखी सुंदर दिसायच्या. इतकी सुंदर चित्र घडवणाऱ्या आमच्या मित्राने स्वत:चं आयुष्य मात्र असं बेरंगी का केलं याचं उत्तर माहित नाही", असं सुबोध म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "तो कधीच स्वत:ची अडचण बोलून दाखवत नव्हता उलट तो आम्हालाच मोठी स्वप्न दाखवायचा.  काही दिवसांपूर्वीच त्याच्या मुलीचं लग्न झालं. अत्यंत थाटामाटात त्याने मुलीचं लग्न केलं. त्या लग्नाला मी गेलो होतो तेव्हा नितीन भेटला. त्याच्याशी गप्पा झाल्या. आपली लेक चांगल्या घरी जातीये याचा त्याला खूप आनंद होता. तो त्याच्या चेहऱ्यावर दिसतही होता. पण, आता त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल राग आला तरीही तो त्याच्यापुढे व्यक्त करता येणार नाही.” 

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईसुबोध भावे सेलिब्रिटी