स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्टार प्रवाहने नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करत सर्वांना एका लोकप्रिय नायिकेच्या पुनरागमनाची आनंदाची बातमी दिली आहे. या नव्या मालिकेत 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर मुख्य भूमिकेत दिसतेय. तर तिच्या विरुद्ध 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेतील सार्थक म्हणजेच अभिनेता अभिषेक रहाळकर मुख्य भूमिकेत आहे.
स्टार प्रवाहने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, 'ती अस्सल गावरान, तो पक्का शहरी... येत आहेत भेटायला... नवी मालिका, 'हळद रुसली, कुंकू हसलं'. या प्रोमोमध्ये समृद्धीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय.
हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत ती साकारत असलेली कृष्णा ही व्यक्तिरेखा थोडी वेगळी आहे. प्रचंड स्वाभिमानी आणि कष्टाळू असलेल्या कृष्णाचं आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम आहे. लहान वयात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आल्यामुळे तिला परिस्थितीची जाणीव आहे. सुखाचे दिवस नक्की येतील असा विचार करणारी आणि त्यासाठी काबाडकष्ट करण्याची कृष्णाची तयारी आहे. कृष्णा लौकिक अर्थाने शिकू शकली नाही. पण, तिचं शेतीचं ज्ञान वाखाणण्यासारखे आहे. गाई-गुरांवर तिचं मनापसून प्रेम आहे. त्यांची आजारपणे, त्यावरची झाडपाल्याची औषधे याची तिला उत्तम माहिती आहे. सगळं आयुष्य शेतात राबण्यात गेलं म्हणून असेल पण स्वयंपाक घरात ती कधीच रमली नाही.
समृद्धी केळकर कृष्णा या पात्राविषयी सांगताना म्हणाली, "टेलिव्हिजन हे माझं सर्वात आवडतं माध्यम आहे. मला असं वाटतं की या माध्यमाद्वारे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून मनोरंजन करु शकतो. दोन अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येताना अतिशय आनंद होतोय. चांगल्या भूमिकेच्या शोधात होते आणि या रोलसाठी विचारणा झाली. या भूमिकेविषयी ऐकताच ती मला क्षणात भावली. कृष्णाच्या निमित्ताने खूप गोष्टी नव्याने शिकता येणार आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. कीर्ती खूप शिकलेली, स्वत:च्या मतावर ठाम आणि सर्वांना सांभाळून घेणारी होती. कृष्णा थोडी वेगळी आहे. कोल्हापुरच्या मातीत ती वाढली आहे. शिकलेली नसली तरी शेतीचं ज्ञान अवगत असणारी. या मालिकेत माझा लूकपण पूर्णपणे वेगळा आहे. नो मेकअप लूक आहे असं म्हण्टलं तरी चालेल. शेतात राबणारी कृष्णा साकारत असल्यामुळे जाणीवपूर्वक मेकअप टाळतेय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची गोष्ट कोल्हापुरातली आहे त्यामुळे कोल्हापुरी भाषेचा लहेजा शिकतेय. प्रेक्षकांना हे नवं पात्र आणि नवी मालिका नक्की आवडेल याची खात्री आहे".