दक्षिणेतील मल्याळम अभिनेत्री आणि पत्रकार रिनी एन. जॉर्ज हिने एका मोठ्या पक्षाच्या युवा नेत्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली होती. हा नेता मला केवळ अश्लील मेसेजच पाठवत नसे तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटण्याचीही ऑफर देत असे. जेव्हा त्याच्या या कृतीबाबत मी पक्षाला कल्पना देण्याचा इशारा दिला, तेव्हा कोणाला सांगायचे आहे त्याला जाऊन सांगायला लाग. अशा शब्दात त्याने मला आव्हान दिले, असा आरोप या अभिनेत्रीने केला होता. मात्र हा नेता कोण याचा उलगडा तिने केला नव्हता. मात्र आता या नेत्याचं नाव उघड झालं आहे.
राहुल ममकूट्टाथिल असं या नेत्याचं नाव असून, तो केरळमधील पलक्कड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा आमदार आहे. तसेच केरळ युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. २०२४ साली झालेल्या पोटनिवडणुकीत तो पलक्कड विधानसभा मतदारसंघातून निवडून आला होता. दरम्यान, अभिनेत्री रिनी एन. जॉर्ज आणि लेखिका हनी भास्करन यांनी केलेल्या शोषणाच्या आरोपांमुळे तो अडचणीत आला होता. तसेच विरोधी पक्षांनी त्याच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. राहुल ममकूट्टाथिल याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाने मोर्चा काढला होता.
दरम्यान, पीडित अभिनेत्री रिनी एन. जॉर्ज हिने गंभीर आरोप करताना या युवा नेत्याचं आणि तो काम करत असलेल्या पक्षाचं नाव जाहीर केलं नव्हतं. मात्र या नेत्याने केलेल्या कृतीबाबत पक्षाच्या नेतृत्वाला माहिती देण्यात आल्याचे तिने सांगितले होते. तसेच अनेक नेत्यांच्या पत्नी आणि मुलीसुद्धा सदर युवा नेत्याच्या गैरवर्तनाची शिकार झाल्या आहेत, असा दावाही या अभिनेत्रीने केला होता. मात्र सदर नेता कोण, हे सांगण्यास मात्र तिने नकार दिला होता. पण ती ज्या नेत्याकडे इशारा करत आहे तो सध्या आमदार असल्याचा सांगण्यात येत होते.
अभिनेत्री रिनी हिने आरोप करताना सांगितले होते की, मला या नेत्याने अनेकदा अश्लील मेसेज पाठवले. त्याने मला एके ठिकाणी बोलावले. जेव्हा मी त्याला तक्रार करण्याची धकमी दिली तेव्हा त्याने मला बिनधास्त तक्रार कर म्हणून आव्हान दिले. जायचं तिथे जा आणि सांग. मला कुणामुळे काही फरक पडत नाही, असे तो म्हणाला.