Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vishnu Manchu : "आकाशात क्षेपणास्त्र, स्फोटांचे आवाज..."; दुबईत अडकला सुपरस्टार; शेअर केला भयानक Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 08:39 IST

Vishnu Manchu : अभिनेता विष्णू मांचू सध्या आपल्या कुटुंबासह दुबईत आहे. त्याने दुबईतून एक हादरवून टाकणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या प्रमुख लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या या युद्धामुळे खळबळ माजली आहे. दुबईमध्येही हल्ले होत असून तेथील आकाशात क्षेपणास्त्र स्पष्टपणे दिसत आहेत. प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विष्णू मांचू याने दुबईतील या भयानक दृश्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेता विष्णू मांचू सध्या आपल्या कुटुंबासह दुबईत आहे. त्याने दुबईतून एक हादरवून टाकणारा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्याने सांगितलं की, २८ फेब्रुवारीच्या रात्री आकाशात क्षेपणास्त्रे स्पष्टपणे दिसत होती आणि हवेत झालेल्या स्फोटांच्या आवाजाने त्याचं घर हादरलं. या स्फोटांच्या आवाजामुळे त्याची लहान मुलगी आयरा प्रचंड घाबरली असल्याचंही त्याने सांगितलं. अशा परिस्थितीत मुलीला घाबरलेलं पाहणं आपल्यासाठी खूप कठीण असल्याचं अभिनेत्याने म्हटलं आहे.

विष्णू मांचूने आपल्या 'X' (ट्विटर) हँडलवर या भयावह दृश्याचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की- "कुटुंबाला भेटण्यासाठी दुबईत आलो आहे. आकाशात क्षेपणास्त्रे दिसत आहेत. स्फोटांच्या तीव्र आवाजाने आमचं घर हादरलं आणि छोटी आयरा घाबरली आहे. मी शांततेसाठी प्रार्थना करत आहे. जगातील कोणत्याही मुलाला आपल्या घरावर युद्धाचे आवाज ऐकत मोठं व्हावं लागू नये. नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल युएई (UAE) संरक्षण दलांचा मी आभारी आहे. असे क्षण आपल्याला आठवण करून देतात की आयुष्य किती नाजूक आहे. शक्ती आणि शांततेसाठी प्रार्थना करत आहे. हर हर महादेव."

अमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधील मुलींची शाळा उद्ध्वस्त; ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू

अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून चाहते त्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. चाहते कमेंट सेक्शनमध्ये त्याला सुरक्षित राहण्याचा आणि स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. याच दरम्यान या अशा परिस्थितीमुळे अभिनेत्री सोनल चौहान देखील दुबईत अडकली आहे. तिने 'X' वर पोस्ट करून पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Missiles in Dubai sky; Superstar Vishnu Manchu shares terrifying video

Web Summary : Actor Vishnu Manchu, in Dubai with family, shared a video of missiles in the sky and explosions. His daughter was frightened by the sounds. Actress Sonal Chauhan is also reportedly stuck in Dubai.
टॅग्स :दुबईइस्रायलइराणयुद्ध