साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री ज्वेल मेरी हिने तिचा कठीण काळ सांगितला आहे. २०१५ मध्ये मेरीने लग्न केलं होतं. मात्र २०२१ पासूनच ती नवऱ्यापासून वेगळी झाली. पण, कायदेशीररित्या घटस्फोट घेण्यासाठी बराच काळ गेला. तब्बल ३ वर्ष कायदेशीर लढा दिल्यानंतर मेरी २०२४ मध्ये या नात्यातून मुक्त झाली. पण, त्यानंतर तिचा आयुष्यातील सगळ्यात कठीण काळाशी सामना झाला. घटस्फोटानंतर मेरीला कॅन्सरचं निदान झालं.
"घटस्फोट खूप सोपा असतो असं मी ऐकलं होतं. पण, माझ्यासाठी तसं नव्हतं. हा संमतीने झालेला घटस्फोट नव्हता. त्यामुळे मला ३-४ वर्ष लढा द्यावा लागला. त्यानंतर ही लढाई मी जिंकले. घटस्फोटानंतर मी आयुष्य एन्जॉय करू शकते असं मला वाटलं होतं. त्यानंतर मी लंडनला गेले होते. तिथे एक महिना मी माझी सोलो ट्रिप एन्जॉय केली. मी तिथे माझा वाढदिवसही साजरा केली. माझ्याकडे असलेले सगळे पैसे मी लंडन ट्रिपवर खर्च केले", असं ती म्हणाली.
कॅन्सरचं निदान!
"मला ७ वर्षांपासून थायरॉइडचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे माझं वजनही मध्येच वाढायचं. त्यासोबत स्ट्रेस आणि PCOD. मी एके दिवशी नॉर्मल चेक अपसाठी गेले होते. तेव्हा खूप कफ बाहेर आला. डॉक्टरांनी याची टेस्ट करण्याची गरज असल्याचं सांगितलं. मी नर्सिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांना काय म्हणायचंय याचा अंदाज मला आला होता. माझे पाय थरथर कापत होते. मी खूप घाबरले होते. कॅन्सर असू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. १५ दिवसांनंतर टेस्टचे रिपोर्ट येणार होते. त्यानंतर पुन्हा टेस्ट करण्यात आली. त्यानंतर मला कॅन्सरचं निदान झालं", असं ज्वेल मेरीने सांगितलं.
पुढे ती म्हणाली, "त्यानंतर माझी सर्जरी करण्यात आली. जी ७ तास चालली. त्यानंतर माझा आवाज पूर्णपणे गेला होता. यासाठी ६ महिने लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मेडिकल इन्शुरन्स नसल्यामुळे माझे सर्व सेव्हिंगचे पैसे उपचारावर खर्च झाले. सहा महिन्यांनंतर मी पुन्हा चेकअपसाठी गेले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की अभिनंदन आता तू कॅन्सरमुक्त आहेस. तो आनंद मी शब्दांत मांडू शकत नाही. आता प्रत्येक ६ महिन्यांनी मला तपासणीसाठी जावं लागतं".