South Actor Abhinay: अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. काहींना या क्षेत्रात यशाची चव चाखायला मिळते तर काहींच्या पदरी निराशा येते. दरम्यान, या ग्लॅमरच्या जगात असे अनेक कलाकार सापडतील ज्यांनी या क्षेत्रावर अधिराज्य गाजवलं. पण, सध्या त्यांच्यावर वाईट परिस्थिती ओढावली आहे. असाच एक अभिनेता ज्याने सुपरस्टार धनुषसोबत दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली. इंडस्ट्रीत धमाकेदार सुरुवात केल्यानंतर आता या अभिनेत्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. तसेच यकृताच्या आजारानेही हा अभिनेता त्रस्त आहे.
४४ वर्षीय या अभिनेत्याचं नाव अभिनय किंगर आहे. अभिनय किंगर हे मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील नावाजलेलं नाव आहे. परंतु, सध्या या अभिनेत्याचे हातात काम नसल्यामुळे त्याच्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे. शिवाय यकृताच्या आजारावर उपचार करण्यासाठी अभिनेत्याकडे पुरेसे पैसे देखील नाही आहेत. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनयने सांगितलं होतं की, सरकारी मेसमधील जेवणावर त्याला निर्भर राहावं लागतंय. अभिनेता धनुषसोबत काम करणारा हा कलाकार जीवन-मरणाशी तोंड देत आहे.
अभिनय किंगर हा दिवंगत मल्याळम अभिनेते टीपी राधामणि यांचा मुलगा आहे. राधामणि यांनी मल्याळम सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र, २०१९ मध्ये त्यांना कॅन्सरचं निदान झालं. अखेरीस त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. वडिलांच्या निधनानंतर अभिनयची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाली.
डबिंग आर्टिस्ट म्हणून केलंय काम
विशेष म्हणजे अभिनय किंगर २००२ मध्ये अभिनेता धनुषसोबत 'थुल्लुवधो इलमई' चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. या चित्रपटातील त्याच्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं. त्यानंतर अभिनेत्याला जे जंक्शन चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर त्याने 'पोन मेगालाई', 'थोडक्कम', 'सोला सोल्ला इनिक्कम', 'पलाइवाना सोलाई' यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील झळकला. अभिनयाव्यतिरिक्त त्याने काही चित्रपटांचं डबिंग देखील केलं आहे. दरम्यान, या अभिनेत्याची अवस्था पाहून त्याचे चाहते चिंतेत आहेत.