Shruti Haasan: सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'कुली' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळतेय. फक्त दोन दिवसांत तब्बल ११८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रुती हसन हिनं प्रीतीची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहण्यासाठी श्रुती थिएटरमध्ये पोहचली होती. यावेळी थिएटरच्या सुरक्षा रक्षकाने तिला ओळखलं नाही आणि तिची गाडी थांबवली. हे पाहून श्रुती आणि तिच्या मैत्रिणी हसून लोटपोट झाल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
चेन्नईच्या वेत्री थिएटरमध्ये १४ ऑगस्ट रोजी 'कुली' पाहण्यासाठी श्रुती हसन तिच्या मित्रमैत्रिणीसोबत पोहचली होती. पण, मात्र, मुख्य गेटवर तिला थोडा अडथळा आला. कारण, थिएटरच्या सुरक्षा रक्षकाने तिची गाडी थांबवली. व्हिडीओमध्ये श्रुती सुरक्षा रक्षकाला विनंती करत म्हणते की, "प्लीज अण्णा! मी स्वतः या चित्रपटात आहे. मी हिरोईन आहे, कृपया मला आत जाऊ द्या". हे ऐकताच गाडीत मागे बसलेल्या तिच्या मैत्रिणी जोरात हसायला लागतात. काही वेळाने सुरक्षा रक्षक गाडीला आत जाऊ देतो.
वेत्री थिएटर्सचे मालक राकेश गौतमन यांनीदेखील हा व्हिडीओ एक्सवर री-पोस्ट केलाय. त्यांनी लिहलं, "माझा मित्र रायलने त्याचे कर्तव्य चांगले पार पाडले. खूप मजेदार क्षण. आमच्याबरोबर असल्याबद्दल धन्यवाद श्रुती हसन मॅडम… आशा आहे तुम्हाला हा शो आवडला असेल".
लोकेश कनगराज दिग्दर्शित 'कुली'या बहुप्रतिक्षित चित्रपटात रजनीकांत यांच्यासह नागार्जुन, सौबिन शाहीर आणि श्रुती हासन प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच आमिर खान आणि उपेंद्र राव यांनी विशेष कॅमिओ केले आहेत. रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील हा १७१ वा चित्रपट आहे. तर याच वर्षी त्यांनी इंडस्ट्रीतली ५० वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केली आहे.