Shruti Haasan,South Stars: दिग्गज अभिनेते कमल हसन यांची (kamal Haasan ) मुलगी अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Haasan) नेहमी तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. श्रुतीने बॉलिवूड ते साऊथपर्यंत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. तिने भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या श्रुती हसन तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने दाक्षिणात्य अभिनेते हे खऱ्या आयुष्यात कसे आहेत, याबद्दल खुलासा केला.
श्रुती हसन नुकतीच रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये पोहचली होती. यावेळी श्रुतीनं रजनीकांत, कमल हसन , थलापती विजय, पवन कल्याण आणि प्रभास यांच्यासोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. श्रुती हासन म्हणाली, "मला वाटतं की दक्षिणेकडील आणि बॉलिवूड कलाकारांमध्ये थोडा फरक आहे. दक्षिणेतील कलाकारांना असं वाटतं की जर त्यांनी योग्य वागलं नाही, तर सरस्वती त्यांच्या डोक्यावरून हात काढून घेईल. ज्ञान आणि कलेच्या देवीचा कोप होईल. म्हणूनच दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये कला, कलाकार आणि कला व्यवसायात नम्रता आहे. त्यांना ती भीती असते. दक्षिणेतील सर्वात मोठे स्टार देखील त्यांचे यश हलक्यात घेत नाहीत. यशाच्या शिखरावरही ते नम्रता गमावत नाहीत. यशस्वी होण्यासाठी नम्रता खूप महत्त्वाची आहे. हाच मुख्य शब्द आहे. जर नम्रता गमावली तर सर्व काही गमावले जाईल. मी असे म्हणत नाही की दाक्षिणात्य चित्रपटातील प्रत्येकजण महान आहे. पण यशाबद्दल विचार करण्याची पद्धत बॉलिवूड कलाकारांपेक्षा वेगळी आहे".
२०१२ मध्ये श्रुतीने पवन कल्याणसोबत 'गब्बर सिंग'मध्ये काम केले होते. हा श्रुतीच्या पहिल्या चित्रपटांपैकी एक आहे. तिचा अनुभव शेअर करताना श्रुती म्हणाली की, "पवन कल्याण आणि थलापती विजय हे सज्जन आहेत. शांत, विनम्र, सौम्य आहेत. पुढे प्रभासबद्दल ती म्हणाली, "तो अजिबात शांत नाही. त्याला मजा करायला आवडतं. 'सालार' दरम्यान मी त्याच्याशी बोललो, तेव्हा मला कळले की तो त्याच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी कृतज्ञ आहे. पण कधीकधी तो पूर्णपणे बेफिकीर होतो. खरं सांगायचं तर तो अजूनही शिकतोय, आहे. समजून घेतोय. तुम्ही म्हणू शकता की तो बालिश आहे. पण तो तितकाच हुशार आहे".
श्रुतीने तिचे वडील कमल हसन आणि रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला. ती म्हणाली, "ते सुपरस्टार असूनही जमिनीवर आहेत. ते खूप हुशार आहेत. सर्वांची काळजी घेतात". तर वडील कमल हासन यांच्याबद्दल श्रुती म्हणाली, "त्यांनी माझं प्रत्येक रुप पाहिलं आहे. माझा बंडखोर स्वभाव पाहिला आहे. मला हवंय ते सर्व करू दिलंय". श्रुती हसन रजनीकांतसोबत 'कुली' या आगामी चित्रपटात झळकणार असून तो १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.