ही घटना आहे २०२१ सालची. जेव्हा कर्नाटकमध्ये झालेल्या एका क्रूर हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या घटनेच्या केंद्रस्थानी होती कन्नड चित्रपट अभिनेत्री शनाया काटवे (shanaya katwe) जी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत होती. ज्या बहिणीने आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली होती, त्याच बहिणीवर त्याच्या हत्येचा आरोप लागला. पोलिसांनी केलेल्या खुलाश्यांमधून समोर आलं की, या हत्येचं कारण एक प्रेमसंबंध होतं. जे शनायाचा भाऊ राकेशला मान्य नव्हते.
हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं, जेव्हा हुबळीच्या देवरागुडीहल जंगलात एका पॉलिथीन बॅगमध्ये अर्धवट जळालेलं आणि कापलेलं शीर सापडलं. त्याचे डोळे उघडे होते, जणू काही तो शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मारेकऱ्यांना पाहत होता. या भयानक दृश्याने पोलिसांना लगेच सतर्क केलं. आजूबाजूच्या परिसरात शोध घेत असताना, एका विहिरीमध्ये शरीराचा धड विचित्र अवस्थेत सापडले आणि आजूबाजूच्या भागांमध्ये शरीराचे इतर तुकडेही विखुरलेले होते. पोलिसांनी तात्काळ एक विशेष पथक तयार केलं, जेणेकरून या क्रूर गुन्ह्याचा छडा लावता येईल. सुरुवातीच्या तपासात हा मृतदेह कोणाचा आहे हे शोधणं कठीण होतं, पण हुबळीमध्ये दाखल झालेल्या एका बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीने पोलिसांना योग्य दिशा मिळाली.
काय होतं हत्येचं कारण?ही तक्रार राकेश काटवेच्या कुटुंबाने दाखल केली होती, जो एका बारमध्ये हाऊसकीपर म्हणून काम करत होता. पोलिसांनी राकेशच्या कुटुंबाला बोलावून सापडलेल्या मृतदेहाच्या तुकड्यांची ओळख पटवून घेतली आणि डीएनए चाचणीतून हा मृतदेह राकेशचाच असल्याची पुष्टी झाली. पोलिसांच्या सखोल चौकशीत शनायाने शेवटी सर्व काही कबूल केलं. तिने सांगितलं की, ती नियाज अहमद नावाच्या एका रिअल इस्टेट एजेंटच्या प्रेमात होती, जो मुस्लिम होता. तिच्या भावाला हे नातं मान्य नव्हतं. राकेशला वाटत होतं की, हे संबंध शनायाच्या करिअर आणि कुटुंबाची प्रतिष्ठा दोन्ही उद्ध्वस्त करतील. त्याने शनायाला अनेक वेळा या नात्याला संपवण्याचा इशारा दिला. जेव्हा शनायाने ऐकलं नाही, तेव्हा राकेशने कुटुंबातील इतर सदस्यांनाही या नात्याबद्दल सांगितलं, ज्यामुळे घरात तणाव वाढला.
भावाला मारण्याचा कट रचलाशनाया आणि नियाजने एकत्र येऊन राकेशला मार्गातून बाजूला करण्याचं ठरवलं. ९ एप्रिल, २०२१ रोजी शनायाने एका नवीन चित्रपटाच्या ऑफरचं सेलिब्रेशन करण्यासाठी एक पार्टी ठेवली. कुटुंबातील सदस्य आणि काही चित्रपटसृष्टीतील लोक या पार्टीत सामील झाले, पण राकेश घरीच थांबला. त्याच रात्री नियाज आणि त्याचे काही मित्र राकेशच्या घरी पोहोचले. त्यांनी आधी राकेशचा गळा दाबून खून केला. त्यानंतर, त्यांनी त्याच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या बॅगमध्ये भरून जंगलात फेकून दिले. त्यांचा उद्देश होता की कोणीही राकेशची ओळख पटवू नये.
अटक आणि पुढील कारवाईपोलिसांनी सर्वात आधी नियाज आणि त्याच्या तीन मित्रांना अटक केली. चौकशीत त्यांच्यापैकी एकाने शनायाच्या सहभागाबद्दल खुलासा केला, त्यानंतर पोलिसांनी शनायालाही अटक केली. या बातमीने कन्नड सिनेसृष्टी आणि अनेकांना धक्का बसला. शनाया, जी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होती आणि तिने 'कांतारा' स्टार ऋषभ शेट्टीसोबतही काम केलं होतं, अचानक एक खूनी म्हणून चर्चेत आली. अटकेनंतर, शनाया काटवेला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं, पण नंतर तिला जामीन मिळाला. हे प्रकरण अद्याप कायदेशीर प्रक्रियेत आहे आणि संपूर्ण देश त्याच्या सुनावणीची वाट पाहत आहे.