Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कांतारा: चॅप्टर १'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, म्हणाली "हे स्वप्न साकार झाल्यासारखं आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:09 IST

'कांतारा: चॅप्टर १' या प्रीक्वेल चित्रपटाबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे.

२०२२ साली रिलीज झालेल्या 'कांतारा' सिनेमा चांगलाच गाजला. अनपेक्षितरित्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलंच शिवाय प्रेक्षकांचं प्रेमही मिळवलं.  हा चित्रपट भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरही चर्चेचा विषय ठरला होता. आता 'कांतारा' सिनेमाचा प्रीक्वल अर्थात 'कांतारा: चॅप्टर १' येतोय.  'कांतारा: चॅप्टर १'चं मोठं अपडेट समोर आलं आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री रुक्मिणी वसंत हिची एन्ट्री झाली आहे.

'सप्त सागरदाचे एल्लो' या चित्रपटातील तिच्या अफलातून अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतल्यानंतर आता रुक्मिणी ऋषभ शेट्टीसोबत काम करणार आहे. रुक्मिणीसाठी हा अनुभव म्हणजे अगदीच स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासारखा आहे. आपल्या भावना व्यक्त करताना रुक्मिणी म्हणाली की, "गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच मला या चित्रपटासाठी विचारणा झाली. त्यावेळी मी ऋषभ सरांना भेटले. त्यांनी मला चित्रपटाची कथा सांगितली आणि अत्यंत नम्रपणे विचारले की, 'तुम्हाला या प्रोजेक्टचा भाग व्हायला आवडेल का?' खरं सांगायचं तर, माझ्यासाठी तो क्षण म्हणजे स्वप्न साकार झाल्यासारखा होता".

रुक्मिणीने पुढे सांगितले, "'सप्त सागरदाचे एल्लो' च्या यशानंतर ऋषभ शेट्टी यांनी कौतुक केलं. प्रीमियरलाही मला प्रोत्साहन दिले. यानंतर त्यांनी मला इतक्या चर्चेतल्या आणि मोठ्या सिनेमात काम करण्याची संधी दिली, ही गोष्ट माझ्यासाठी खूपच खास आहे". शिवाय, 'कांतारा: अ लेजेंड चॅप्टर १' मध्ये निवड झाल्याची बातमी गुप्त ठेवणे तिच्यासाठी खूप कठीण होतं, असं रुक्मिणीने सांगितलं. ती म्हणाली, "ज्या दिवशी हे निश्चित झाले, त्या दिवशी मला ओरडून सांगावसं वाटलं होतं. पण योग्य वेळेची वाट पाहणे महत्त्वाचे होते, त्यामुळे ही बातमी स्वतःपुरती ठेवली होती. मला सतत माझ्या पुढच्या कन्नड प्रोजेक्टबद्दल विचारणा व्हायची. तेव्हा मला अनेक वेळा सगळं काही सांगावं वाटायचं. आता अखेर ही बातमी बाहेर आल्यामुळे मला खूप समाधान आणि आनंद होत आहे".

टॅग्स :सेलिब्रिटीTollywood